नाशिक : राज्याला विकासाकडे नेणारा मार्ग म्हणून गवगवा होत असलेल्या समृध्दी महामार्गाचा अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठीही वापर होऊ लागला आहे. ग्रामीण पोलिसांनी समृध्दी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद केली. या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेत ३६ लाख, ३९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून अमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे समृध्दी महामार्ग परिसरात त्यांनी सापळा रचला.
समृध्दी महामार्गाने नागपूरकडून मुंबईकडे दोन चारचाकी वाहनांमधून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार होती. ही तस्करी रोखण्यासाठी चार पथके सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील समृध्दी महामार्गावर गस्तीवर नेमण्यात आली. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने संशयित दोन मोटारी भरधाव येतांना दिसल्यावर पथकाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका मोटारीने वळण घेत नागपूरच्या दिशेने परत फिरली.
एक मोटार मात्र मुंबईच्या दिशेने गेली. दोन्ही मोटारींचा पोलीस पथकाने पाठलाग करुन कोकमठाण टोलनाक्याजवळ एक मोटार अडवली. दुसऱ्या मोटार चालकाने शिवडे शिवारात मोटार थांबवून पलायन केले. दोन्ही मोटारींमधून पोलिसांनी २४ लाख, २८ हजार ५८० रुपये किंमतीचा १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा गांजा, वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन मोटारी, तीन भ्रमणध्वनी, १५ हजार रुपये रोख असा ३६ लाख, २९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत पोलिसांनी भारत चव्हाण (३५), तुषार काळे (२७) आणि संदीप भालेराव (३२) तिघेही रा. नेवासा यांना ताब्यात घेतले. तसेच सुनील अनार्थे (रा. शिर्डी) हा फरार झाला. सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार संशयित टिप्पर गँगचा सदस्य
फरार सुनील अनार्थे हा नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अंबड, सातपुर, सरकारवाडा पोलीस ठाण्यात मकोका, घरफोडी, हत्यार बाळगणे, हत्येचा प्रयत्न, असे गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या शिर्डी तसेच श्रीरामपूर परिसरात राहत आहे. त्याचा साथीदार संदीप याच्यावर पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा आणि चोरी असे गुन्हे दाखल आहेत.