नाशिक : आगामी नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांच्या वतीने शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था परिस्थितीसह इतर अनेक विषयांवर १२ सप्टेंबर रोजी संयुक्तपणे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या वतीने संयुक्तपणे या मोर्चाच्या नियोजनासाठी बैठका घेण्यात येत आहेत.

नाशिक रोड परिसरातील कदम लॉन्स येथे दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नाशिक महापालिकेचा गैरकारभार, प्रशासनातील निष्क्रियता, शहरातील अनेक भागात भेडसावणारी पाणी टंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, शहरातील वाढती गुन्हेगारी आदी विषयांवर संयुक्त बैठकीत चर्चा झाली. ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, भारती ताजनपुरे, स्वाती पाटील, अस्लम

मणियार, युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, सागर भोजने, योगेश गाडेकर, विभागप्रमुख स्वप्निल आवटे आदींसह मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, विभाग अध्यक्ष बंटी कोरडे आदी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा आहे. दोन्ही ठाकरे बंधु पुन्हा एकत्र आले. त्यांचे विचार ऐकल्यानंतर जनतेत उत्साह निर्माण झाला. भाजपने सत्तेसाठी मित्रपक्षांना धोका दिला. भ्रष्टाचार करून पक्ष फोडले.

पैशाच्या जोरावर सत्ता मिळविण्याचे काम केले. काळा पैसा प्रतिबंध, रोजगार, कर्जमाफी आदी आश्वासने पूर्ण केली नाहीत. नाशिक शहरातील गुन्हेगारी, अमली पदार्थांचा व्यापार, हॅनी ट्रॅप प्रकरण, हत्या यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. १२ सप्टेंबरला सरकारविरोधी महामोर्चा काढण्यात येणार असून मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन दत्ता गायकवाड यांनी केले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी, लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामे थांबली असल्याचा आरोप केला.

ठेकेदारांचे पैसे थकले आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम ठप्प झाले. राजकीय फायद्यासाठी पैशांचा दुरुपयोग होत आहे. निवडणुकीत गैरप्रकार करण्यात आले. गुन्हेगारी वाढत आहे. कायदा-सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे. हत्या, दरोडे, बलात्कार यासारख्या घटना घडत आहेत. योजनांमध्ये भ्रष्टाचार, अपूर्ण प्रकल्प, यामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. शेतकरी, कामगार, कष्टक-यांच्या प्रश्नांवर लढा देणे गरजेचे आहे. उध्दव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे बदल घडून येण्याचा नागरिकांना विश्वास आहे, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.