नाशिक – आडगाव परिसरात महिला व्यवसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या शिवसेना (उध्दव ठाकरे) पदाधिकाऱ्यासह चार जणांना आडगांव पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयितांवर आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सारिका शिरोडे (४०) यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी २०२० पासून ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत लहान स्वरूपातील बांधकाम व्यवसाय करीत असतांना विशाल कदम, सिध्देश्वर अंडे, अमित पाटील आणि शंकर वाडेकर यांच्याकडून व्यावसायिक कामासाठी हातउसनवारीने पैसे घेतले. विशाल हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असून त्याने शिरोडे यांना दिलेल्या कर्जावर व्याज आकारणी सुरू केली. या व्याज आकारणीसाठी शिरोडे यांच्या पतीचे चारचाकी वाहनातून अपहरण करीत जबरदस्तीने कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. भ्रमणध्वनीवर संपर्क करत धमक्या देत पैसे देऊन टाक अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. शिरोडे आणि त्यांच्या पतीच्या नावावर असलेल्या मालमत्ता हडप केल्या. मालमत्ता खरेदी केल्यानंतर त्यांनी शिरोडे यांच्या बँक खात्यावर दिशाभूल करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने रक्कम पाठविण्यात आल्याचे दाखविले.
पाठवलेली रक्कम शिरोडे यांना धमकावत विशाल याच्या मित्रांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. विशालने शिरोडे यांच्या खात्यातील अन्य रक्कमही मित्रांच्या तसेच नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग केली. या सर्व कालावधीत संशयितांकडून शिरोडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. याविरोधात आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात विशाल व त्याचा साथीदार सिध्देश्वर याला ताब्यात घेतले. संशयितांना आडगाव पोलिसांनी आपला खाक्या दाखविला. ही मंडळी तेथून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे म्हणतच बाहेर पडली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नाशिक – आडगाव परिसरात महिला व्यवसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पदाधिकाऱ्यासह चार जणांना आडगांव पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयितांवर आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.… pic.twitter.com/UVsWp2ospl
— LoksattaLive (@LoksattaLive) October 27, 2025
राजकीय पार्श्वभूमी असलेले खासगी सावकार
काही वर्षांपासून राजकीय पार्श्वभूमी असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते हे खासगी सावकारीत उतरत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचा (अजित पवार) वैभव देवरे, भाजप पदाधिकारी कुंदनवाल पिता-पुत्र यांसह इतरही काही जणांचा समावेश आहे. शिरोडे प्रकरणात ठाकरे गटाचा विशाल कदम याचे नाव समोर आले.
