नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक छोटी, छोटी विकास कामे एकत्रित करून मोठ्या रकमेच्या निविदा काढल्या गेल्या. स्थानिक ठेकेदारांना डावलून काही ठराविक आणि त्यातही गुजरातच्या बड्या कंपन्या, कंत्राटदारांना कामे दिली गेल्याचा आरोप होत आहे. यावर कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले.

गोदावरीच्या काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २० हजार कोटींहून अधिकच्या कामांचे आराखडे तयार झालेले आहेत. यामध्ये नाशिक भोवती बाह्य वळण रस्ते, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे सहापदरीकरण, नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या अनेक मार्गांचे बळकटीकरण, नवीन पूल, घाट व कुंड बांधणी, मुकणे पाणी पुरवठा योजना, त्र्यंबकेश्वर नगरीस पाणी पुरवठा आणि गोदावरी प्रवाही ठेवण्यासाठी योजना, साधूग्रामची उभारणी, तंबुंचे शहर अशी व्यापक कामे केली जाणार आहेत. कुंभमेळ्यास अवघ्या दीड वर्षांचा कालावधी राहिल्याने ज्या कामांना अधिक कालावधी लागणार आहे, अशा कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन युद्धपातळीवर ती सुरू करण्याचा कुंभमेळा प्राधिकरण व यंत्रणांचा प्रयत्न आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात अनेक छोटी छोटी विकास कामे सार्वजनिक बांधकाम व महानगरपालिकेने एकत्रित करून मोठ्या रकमेच्या निविदा काढल्या. जेणेकरून सामान्य ठेकेदार त्यात सहभागी होऊ शकणार नाही अशा पद्धतीच्या जाचक अटी, शर्ती टाकून स्थानिक ठेकेदारांना त्यापासून डावलले गेल्याची तक्रार रखडलेल्या देयकांसाठी आंदोलन करणाऱ्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेसह ठेकेदारांच्या संघटनांकडून होत आहे. मोठ्या स्वरुपातील ही कामे गुजरातच्या कंपन्या व कंत्राटदारांना दिली गेल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १४०० कोटी रुपयांच्या निविदा काढून ठराविक कंत्राटदारांना कामे दिली. महानगरपालिकेेने तीच कार्यपद्धती अनुसरल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

कुंभमेळ्यातील काही कामांचे एकत्रिकरण अर्थात क्लब टेंडरिंग करावे लागल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. परंतु, गुजरातच्या कंत्राटदारांना कामे दिल्याचा आक्षेप फेटाळला. गुजरातची कंपनी कुठेही नाही. असेल तर ती दाखवावी असे आव्हान त्यांनी दिले. सध्याच्या व्यवस्थेत देशभरात कुणाला कुठेही निविदा भरता येते. गुजरातची कंपनी असणार नाही. असे बंधन नाही. कोणाला थांबवता येत नाही. महाराष्ट्रातील ठेकेदार परराज्यात काम करतात, असा दाखला त्यांनी दिला. एक, दोन किलोमीटरच्या रस्ताचे काम लहान, लहान स्वरुपात १० ठेकेदारांना दिल्यास त्यांच्या मागे कोण पळणार. आता घाई आहे. कामे वेळेत व दर्जेदार झाली पाहिजे. त्यामुळे लहान स्वरुपात त्यांची विभागणी करता येणार नाही. यामागे दुसरा कुठलाही हेतू नाही. ही सर्व कामे चांगली व वेळेत करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केला. कुंभमेळ्यातील अन्य कामात स्थानिक ठेकेदारांचा सहानभुतीपूर्वक विचार केला जाईल अशी पुष्टी त्यांनी जोडली.