नाशिक : भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते संलग्न असल्याशिवाय ऑनलाईन रमी खेळता येत नाही. आपला भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते रमीसाठी संलग्न केलेले नाही. याची चौकशी करता येईल. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली, तेव्हापासून एक रुपयाची रमी खेळलेलो नाही. हा खेळ आपल्याला खेळताच येत नाही, असा पवित्रा आता राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी घेतला आहे.

विधिमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याची चित्रफित आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केल्यानंतर बचाव करताना खुद्द कोकाटे आणि राष्ट्रवादीची (अजित पवार) कोंडी झाल्याचे दिसते. याच कारणावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर छावा संघटनेकडून पत्ते फेकण्यात आले. संतप्त अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देणाऱ्यांना बडवले. विरोधकांच्या आरोपांवर कृषिमंत्री कोकाटे यांनी, आपण भ्रंमणध्वनीवर डाऊनलोड झालेला खेळ बंद करत होतो, इथपासून ते युट्यूब सुरू करताना रमीची जाहिरात आली, रोहित पवारांनी अर्धवट चित्रफित प्रसारित केली, असे दावे केले होते.

मंगळवारी नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोकाटे यांनी ऑनलाईन रमी खेळाबद्दल बराच अभ्यास केल्याचे दिसून आले. मुळात हा छोटा विषय इतका का लांबला ते कळले नाही. ऑनलाईन रमीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते संलग्न असावे लागते. आपल्या भ्रमणध्वनी आणि बँक खात्याची चौकशी करावी, असे आव्हान त्यांनी दिले. ऑनलाईन रमी जेव्हापासून सुरू झाली, तेव्हापासून एक रुपयाची रमी खेळलो नाही. कारण तो आपणास खेळताच येत नसल्याचा दावा त्यांनी केला. सभागृहात लक्षवेधी होती. याबद्दल महिती घेण्यासाठी आपण भ्रमणध्वनी मागविला. तो सुरू केल्यावर भ्रमणध्वनीवर खेळ समोर आला. तोच आपण बंद करत होतो, याचा कोकाटे यांनी पुनरुच्चार केला. विरोधकांनी अर्धवट चित्रफित दाखवली. या संपूर्ण प्रकरणात आपली मोठी बदनामी करण्यात आली. ज्यांनी आरोप केले, त्यांना न्यायालयात खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कोकाटे यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीतून सर्व उघड होईल…

कथित रमी प्रकरणात आरोप करणारे राजकीय विरोधक कोणाच्या संपर्कात होते, कोणाशी बोलत होते हे तपासायला हवे. चित्रफित कुणी काढली ते माहिती नाही. परंतु, ज्यांनी बदनामी केली, त्यांना नोटीस पाठविणार असल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी म्हटले आहे. कोण नेते, कोणाशी बोलतात, प्रसारमाध्यमांतील मंडळी कुणाशी बोलतात हे सगळे चौकशीतून समोर येईल. माझ्याबाबत काही सापडणार नाही असा दावाही त्यांनी केला. सभागृहात अध्यक्षांना वाटले तर ते भ्रमणध्वनीवर प्रतिबंध घालू शकतात, असेही कोकाटे यांनी नमूद केले.