रणजी सामन्यांसाठी इतरत्र हजार प्रेक्षकही उपस्थित राहत नसताना नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा सामन्यासाठी चारही दिवस ओसंडून वाहणारी गर्दी.. डोंगरे वसतिगृह मैदानावर ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर रंगलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक नाशिक कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेसही अपेक्षेपेक्षा मिळालेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद..

कोणताही कार्यक्रम किंवा स्पर्धा यशस्वितेचे मोजमाप जर गर्दीचा निकष लावून करावयाचे म्हटले तर नाशिकला झालेला रणजी सामना आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन निश्चितच यशस्वी झाले. गर्दीपेक्षा नेटकेपणा, उत्तम व्यवस्था, खेळाडूंचे समाधान या निकषावर छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये रंगलेल्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय खो-खो स्पर्धेच्या आयोजनालाही अव्वल गुण द्यावे लागतील. एकूणच, वर्षांचा शेवट करणाऱ्या डिसेंबरने नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात या तीन स्पर्धाच्या उत्तम आयोजनाने वेगळीच जान आणली. हे सर्व यशस्वी होण्यासाठी आयोजकांनी काही महिन्यांपासून केलेले प्रयत्न आणि कष्ट कारणीभूत आहेत. जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने समर्पण नाशिकच्या वतीने आयोजित अखिल भारतीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेने या आनंददायक ‘क्रीडा महोत्सव’ची सुरुवात झाली. प्रेक्षकांची अल्प उपस्थिती भरून काढण्याचे काम काहीअंशी स्पर्धेसाठी उपस्थित संघांच्या खेळाडूंनी केले. खेळाडूंचा उत्साह आणि स्पर्धेविषयी त्यांनी व्यक्त केलेले समाधान आयोजकांचे कष्ट दूर करून गेले.

अनंत कान्हेरे मैदानाने याआधीही अनेक रणजी सामने पाहिले आहेत. सर्व सामन्यांपेक्षा उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा या सामन्यास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद सामना खेळणाऱ्या खेळाडूंप्रमाणेच आयोजकांनाही धक्का देणारा ठरला. मुंबई किंवा महाराष्ट्राचा संघ नसतानाही प्रेक्षकांनी क्रिकेट म्हणून सामन्याचा खरा आनंद घेतला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे नाशिकला पुढील काळात अजूनही रणजी सामन्यांचे आयोजन मिळू शकते.

प्रामुख्याने ‘प्रदर्शनांचे मैदान’ म्हणून ओळख असलेल्या डोंगरे वसतिगृह मैदानावर नाशिक विभागीय कबड्डी स्पर्धेस क्रीडाप्रेमींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने शेवटच्या दिवशी अक्षरश: उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती.

राजकीय मंडळींचा क्रीडा स्पर्धेत प्रवेश झाल्यावर काही प्रमाणात त्याचा त्रास खेळाडूंसह क्रीडाप्रेमींनाही सहन करावा लागतो. हे या स्पर्धेतही दिसून आले. अंतिम सामना एकीकडे रंगला असताना त्याच वेळी व्यासपीठावर सत्कार उरकण्यात येत होते. मराठमोळ्या खेळाच्या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वच मराठीजन असताना एक सूत्रसंचालक हिंदीमधून अक्षरश: किंचाळत होता. त्याच्या या किंचाळण्याचा त्रास खेळाडूंनाही झाला. कबड्डीच्या मैदानाला उंची दिलेली असताना प्रेक्षक गॅलरीचा खालील भाग मात्र त्याप्रमाणात करण्यात आलेला नव्हता. ‘फोटोसेशन’च्या चढाओढीत प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि ऑलिम्पियन दत्तू भोकनळ बऱ्याच वेळा मागे लोटले जात होते. अशा काही त्रुटी वगळता स्पर्धा निश्चितच उत्कृष्ट झाली. प्रो कबड्डीसारखे ग्लॅमर नाशिककरांना अनुभवता आले. नाशिकमध्ये झालेल्या या तीनही स्पर्धाच्या आयोजनातील एक अनोखे वैशिष्टय़ म्हणजे आयोजनात खऱ्या अर्थाने श्रम करणारे हात प्रामुख्याने झाकोळलेलेच राहिले.

गर्दीचे गणित बऱ्यापैकी जमले

‘प्रो कबड्डी’ची ‘सेम टू सेम’ नक्कल करण्याचा प्रयत्न बहुतांश प्रमाणात यशस्वी झाला असला तरी एखादी मोठी संस्था आणि महानगरपालिका आयोजनात एकत्र असतील तर काही नावडत्या गोष्टीही सहन कराव्या लागल्या. क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था आयोजनात असल्याने गर्दीचे गणित आपोआपच बऱ्यापैकी जमले. त्यात वेगवेगळ्या संघांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक नाशिकचे खेळाडू असल्याने हे गणित तंतोतंत जुळले. त्यामुळे स्पर्धा सुरू होण्याआधीच प्रेक्षक किती संख्येने येतील, हा प्रश्न निकाली निघाला. तीन हजारांची गृहीत धरलेली प्रेक्षकसंख्या आणि त्यानुसार केलेली गॅलरीची व्यवस्था शेवटच्या दिवशी अपुरी पडली. बहुतांश प्रेक्षकांना उभे राहूनच अंतिम सामन्याचा आनंद घ्यावा लागला.