नाशिक : जिल्हा तसेच राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. एक जुलैपासून सुरु झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत २० हून अधिक शाळाबाह्य विद्यार्थी आढळले असले तरी असे विद्यार्थी शोधण्यात, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात शिक्षकांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करत असतांना कागदपत्रांची पूर्तता हा प्रमुख अडसर ठरत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे.
नाशिक शहर तसेच जिल्ह्यात एक ते १५ जुलै या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्हा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून ५०० हून अधिक कुटूंबाशी संपर्क साधला आहे. मोहिमेच्या माध्यमातून शाळेत कधीच दाखल न झालेले, मध्येच शाळा सोडून गेलेले तसेच स्थलांतरित झाल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. वय वर्ष तीन ते १८ या वयोगटातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील २०० हून अधिक शिक्षक या मोहिमेत सहभागी आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मोहिमेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, बालविकास आणि प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी, महसूल विभाग, अधिकारी स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी या सर्वांचा सहभाग असणार आहे.
दरम्यान, मोहिमेत ग्रामीण भागात स्थलांतरीत बालके तर शहर परिसरात सिग्नलवर भीक मागणारे, झोपडपट्टी परिसरातील बालके शाळाबाह्य असल्याचे लक्षात येत आहे. या बालकांना शाळेत दाखल करतांना कागदपत्रांची अडचण येत आहे. याविषयी उन्नती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी माहिती दिली. शाळेत शाळाबाह्य विद्यार्थी दाखल होत असले तरी या बालकांकडे आधारकार्ड, जन्मदाखला, जातीचा दाखला अशी कुठलीच कागदपत्रे नाहीत. यामुळे हे विद्यार्थी शिक्षण विभागाच्या युडायस पोर्टलवर येत नाहीत. त्यांना कुठल्याही शैक्षणिक योजनेचा लाभ मिळत नाही. हे विद्यार्थी प्रवेशित असले तरी पटलावर येत नाहीत. जे विद्यार्थी परप्रांतीय आहेत. त्यांची नावे पूर्ण नसतात. याचाही फटका प्रवेश घेतांना येत आहे. पालकांची अनास्थाही कामात अडचणी आणत आहे. या सगळ्याचा विचार होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या वतीने शिबीरे घेत संबंधितांना दाखले मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.
नाशिक जिल्ह्यात एक ते १५ जुलै या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्हा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून ५०० हून अधिक कुटूंबाशी संपर्क साधला आहे. या मोहिमेत शिक्षकांना काही अडचणीही भेडसावत आहेत.