नाशिक: पुणे, पिंपरी चिंचवड भागातील मुसळधार पावसाने नाशिक-पुणे महामार्गावर पाणी आल्याचा विपरित परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक-पुणे बससेवेवर झाला. अनेक बस वाहतूक कोंडीत अडकल्या. प्रवाशांचे हाल झाले. चाकणच्या पुढे बस मार्गस्थ करणे अवघड झाल्याने गुरुवारी दुपारी काही काळ नाशिकमधून पुण्याला बस सोडणे स्थगित करण्यात आले होते.

पुण्यासह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस झाल्याचा परिणाम नाशिक-पुणे वाहतुकीवर झाला आहे. मोशी आणि नाशिक फाटा दरम्यान पाणी साचल्यामुळे नाशिकहून जाणाऱ्या काही बस वाहतूक कोंडीत अडकल्या. काही चाकणजवळ थांबवून माघारी वळविण्यात आल्या. रस्त्यावरील पाण्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्या्मुळे पुण्याकडे जाणाऱ्या बस केवळ चाकणपर्यंत चालविल्या जात होत्या. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन दुपारी तीननंतर नाशिकहून पुण्याला बस सोडणे थांबविण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसला पुण्यात जाण्यासाठी बराच वेळ लागत आहे. त्यामुळे दैनंदिन बससेवा विस्कळीत झाली.

हेही वाचा : अंबड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, नाशिक-मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकहून पुण्यासाठी दररोज ६० बसच्या सुमारे १०० फेऱ्या होतात. राज्य परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा हा मार्ग आहे. पुण्यातील पावसामुळे बस वाहतुकीवर ४० टक्के परिणाम झाल्याचे महामंडळाचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी सांगितले. नाशिक-पुणे मार्गावर चाकण हे पुणे शहराच्याआधी ३२ किलोमीटरवर आहे. काही बसमधील प्रवासी मोशी येथे उतरले. त्यानंतर या बस माघारी बोलावण्यात आल्या. सायंकाळनंतर हळूहळू बस सोडल्या जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पावसामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर पाणी फेरले. या मार्गावर नाशिक आगाराला दैनंदिन सुमारे १० लाखाचे उत्पन्न मिळते. बससेवा विस्कळीत झाल्यामुळे त्यावरही परिणाम झाला.