नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारी महिन्यापेक्षा अधिक दिवस ठिय्या देवून असलेल्या आदिवासी आश्रमशाळातील तृतीय आणि चतुर्थश्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी आंदोलनाच्या ३५ व्या दिवशी संयम सुटला. बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांना न जुमानता आंदोलकांनी आदिवासी विकास भवन आवारात शिरकाव केला. घोषणाबाजी करुन आंदोलकांनी नोकरीवर रूजू होण्याच्या आदेशाची होळी केली.
शासनाने बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरूवात केली आहे. त्याला विरोध करण्यासाठी आदिवासी आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी महिन्यापेक्षा अधिक दिवसांपासून आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या देवून आहेत. आजपर्यंत आंदोलकांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवळ, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह मनसेचे दिनकर पाटील आदींनी भेट घेतली आहे. सरकार आपल्या भूमिकेवर तर आंदोलकही मागण्यांवर ठाम राहिले आहेत. शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी आंदोलक आक्रमक झाले.
सकाळपासूनच प्रवेशद्वार, कार्यालयाच्या भिंतीवरून उड्या मारत आदिवासी विकास भवनात शिरण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात येत असताना पोलिसांकडून त्यांना अटकाव करण्यात येत होता. सायंकाळी आंदोलकांनी पोलिसांना विरोध झुगारुन भवन आवारात शिरकाव केला. कार्यालयात आदिवासी आयुक्त लीना बनसोड उपस्थित नव्हत्या. आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी किनवट आदिवासी प्रकल्पाच्या काजल गेडाम या जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला.
शासनाच्या वतीने आंदोलकांपैकी काहींना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, हे आदेश म्हणजे अवनती असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आंदोलक ललित चौधरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. आदिवासी विकास विभागात बाह्यस्रोत कंपनीमार्फत दिलेले आदेश आम्हांला मान्य नाहीत. अशा पद्धतीने आमच्या पदांवर बाहेरच्या कंपन्यांचे वर्चस्व आणणे, हा आमच्या हक्कांवर घाला असल्याचे त्यांनी सांगितले. रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे, या मागण्यांवर आंदोलक आजही ठाम असल्याचे चौधरी यांनी नमूद केले.
आंदोलक आदिवासी विकास भवन आवारात शिरल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी धाव घेतली. कार्यालयात शिरण्याचा आंदोलकांचा प्रयत्न बेकायदेशीर असल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा राऊत यांनी दिला. आंदोलकांनीही गुन्हे दाखल करून घेण्याची तयारी दर्शविली. पोलीस आयुक्त कर्णिक आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत आंदोलक आपली भूमिका स्पष्ट करतील. असे आंदोलकांच्या वतीने ललित चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.