विजयी मेळावा नियोजन बैठकीत महाआघाडीसह मनसेही सहभागी

नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळा प्रायव्हेट लिमिटेड होत असून नियोजनात विरोधी पक्ष सोडा, सत्ताधारी स्वपक्षाच्या आमदारांनाही विश्वासात घेण्यात येत नसल्याचे टिकास्त्र शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार राजाभाऊ वाजे यांनी सोडले. कुंभमेळा हा कोणाचा खासगी नसून नाशिककरांचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, मनसेसह सर्वपक्षीयांनी अशीच एकजूट ठेऊन लढा दिला तर आपल्याला कुंभमेळा नाशिककरांचा करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

शालिमार येथील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात हिंदी सक्ती रद्द झाल्यानंतर पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या सर्वपक्षीय विजयी मेळाव्यासंदर्भात नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांसह मनसेचा सहभाग लक्षणीय ठरला. खासदार वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस, माकपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी मनसेच्या राजगड कार्यालयातील कार्यक्रमास ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मनसेचे पदाधिकारी बैठकीनिमित्त प्रथमच ठाकरे गटाच्या कार्यालयात आले.

यावेळी खासदार वाजे यांनी कुंभमेळा नियोजनावरून सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. सर्वपक्षीय एकजुटीबद्दल आनंद व्यक्त करीत त्यांनी मराठी माणूस आणि ठाकरे ब्रँडच्या एकजुटीच्या ताकदीसमोर सरकारला झुकावे लागल्याचे सांगितले. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. एकजूट असली की काय होऊ शकते, याची आता फक्त झलक दिसली आहे. आगामी काळात अशीच एकजूट ठेवल्यास असे काही निर्णय असो की निवडणूका असोत, आपल्याला कोणीच रोखू शकत नसल्याकडे वाजे यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या एकजुटीचा आनंद साजरा करण्यासाठी पाच जून रोजी मुंबईत महामेळावा होत आहे. सर्वांनी मोठ्या ताकतीने मुंबईमध्ये जमून मराठी माणसाची, महाराष्ट्राची एकजूट काय असते ते दाखवून देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राष्ट्रवादीचे (शरद पवार) गजानन शेलार, काँग्रेसचे शरद आहेर, माकपचे तानाजी जायभावे, मनसे महिला उपाध्यक्ष सुजाता डेरे आदी उपस्थित होते.