नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएने राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या विरोधात स्थानिकांना ऐन दिवाळीत आंदोलन करावे लागले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार) छगन भुजबळ, ॲड. माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ तर, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) दादा भुसे असे एकूण चार मंत्री आहेत.

परंतु, एकाही मंत्र्याने दयामाया दाखवली नसल्याची खंत स्थानिक आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली होती. पुढील काळातही हे मंत्री अलिप्तच राहिले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे मदतीला धावल्याकडे लक्ष वेधत आ. खोसकर यांनी स्थानिक मंत्र्यांनी हा विषय गांभिर्याने घेतला नसल्याची अस्वस्थता व्यक्त केली.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. या अनुषंगाने एनएमआरडीएने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. या विरोधात स्थानिकांंनी रास्ता रोको, साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला. साधारणत: ३० किलोमीटरचा हा मार्ग देवळाली आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या दोन विधानसभा मतदारसंघातून जातो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरोज अहिरे आणि हिरामण खोसकर या आमदारांनी एनएमआरडीएची कारवाई चुकीची ठरवली.

साधू-महंत हे देखील स्थानिकांच्या पाठिशी उभे राहिले. त्र्यंबकेश्वर ये्थील बैठकीत आ. हिरामण खोसकर यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांवर रोष प्रगट केला होता. जिल्ह्यात आदिवासी समाजाचा एक, मराठा समाजाचे दोन, माळी समाजाचा एक असे एकूण चार मंत्री आहेत. लोक रस्त्यावर उतरले असताना मंत्र्यांना दयामाया आली नाही. साधू-महंतांना जेे कळते, ते या मंत्र्यांना कळत नाही. असा टोला त्यांनी लगावला होता. पुढील काळातही संबंधित मंत्र्यांनी संपर्क साधला नसल्याचे आ. खोसकर यांनी सांगितले.

याप्रश्नी अखेर आमदार खोसकर आणि आमदार अहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागत अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला तात्पुरती स्थगिती मिळवली. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत. या पाहणीत आम्ही बरोबर राहून परिस्थिती मांडणार आहोत. स्थानिक मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त करूनही कोणी संपर्क साधला नाही. उलट गिरीशभाऊ मदतीला धाऊन आले. त्यांच्याकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी संर्वतोपरी मदत केली जात आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहीम तुर्तास थांबलेली आहे. नाशिकच्या मंत्र्यांनी हा प्रश्न गांभिर्याने घेतला नाही. आजवर चार कुंभमेळा झाले. रस्ता तेवढाच आहे. आताही रुंदीकरण करताना काही प्रमाणात वाढविण्यास हरकत नाही. ज्यामुळे बहुसंख्य स्थानिकांची घरे वाचतील. धरणात जमिनी गेलेल्या लोकांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर थोडीफार जागा घेऊन बंगले व संलग्न गाळे बांधले. त्यांना दिलासा मिळावा, हा आमचा प्रयत्न असल्याचे आ. खोसकर यांनी म्हटले आहे.