नाशिक : राज्य सरकार नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे दरम्यान संरक्षण क्षेत्राशी संबंधित नव्या औद्योगिक मार्गिकेची आखणी करीत असून नाशिक हे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उत्पादनाचे नवीन केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यामुळे सात वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या लष्करी सामग्री उत्पादन, नाविन्यपूर्ण केंद्राच्या संकल्पनेला एकप्रकारे बळ मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे बुधवारी मुंबई येथे आयोजित उद्योग परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील काळात नाशिक हे संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाचे नवे केंद्र बनणार असल्याचे जाहीर केले. मार्गिका अंतर्गत या ठिकाणी मुख्यत्वे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले. दरम्यान, नाशिकमध्ये संरक्षण व एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित उद्योगांना विविध संधी आहेत. हे लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी लष्करी सामग्रीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. परंतु, त्याची अद्याप प्रतिक्षाच आहे.
उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (निमा) याचा सविस्तर प्रकल्प अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर केला होता. नंतर स्थानिक पातळीवर विकसित करता येईल, अशा १२७ सुट्या भागांची निवड केली. लष्करी सामग्री उत्पादन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या केंद्राच्या संकल्पना वेगवेगळ्या असल्याचे निमाचे म्हणणे होते. नाशिकच्या नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्राद्वारे संरक्षण उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन, नवउद्यमींसह उत्पादनास प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारने संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील गुंतवणुकीत नाशिकला प्राधान्यक्रम देण्याचे निश्चित केल्यामुळे स्थानिक पातळीवर या क्षेत्रातील उद्योगांची पायाभरणी होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सद्यस्थितीत ओझरच्या एचएएल कारखान्यात सुखोई लढाऊ विमानांची बांधणी केली जाते. तेजस या स्वदेशी विमानांचे उत्पादनही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. या लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागाचे काही पुरवठादार नाशिकसह राज्यात आहे. तोफखान्याचे देशातील मुख्य प्रशिक्षण केंद्र देवळाली कॅम्पमध्ये आहे. त्यालगत लष्करी हेलिकॉप्टर व वैमानिकरहित विमानांचे (युएव्ही) प्रशिक्षण केंद्र आहे. संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानची ॲडव्हान्स सेटर फाॅर एनर्जेटिक मटेरियल्स ही प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर कार्यरत आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातील उद्योगांसाठी आवश्यक ते पोषक वातावरण स्थानिक पातळीवर आधीपासून उपलब्ध आहे.
लढाऊ विमानांची निर्मिती करणारे एचएएल, तोफखाना केंद्र आणि संरक्षण दलाशी संबंधित अन्य आस्थापनांमुळे नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना मोठा वाव आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित वेगवेगळे केंद्र तयार झाल्यास उद्योगांना चालना मिळू शकेल. ही बाब निमाने अलीकडेच मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती. नाशिकबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून निमाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.आशिष नहार (अध्यक्ष, निमा)