नाशिक : काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात अपघात होऊ लागले आहेत. पावसामुळे रस्ते निसरडे होणे, रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने या गोष्टी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. बुधवारी येवला तालुक्यात असाच एक अपघात घडला. नाशिक ते छत्रपती संभाजी नगर हा महामार्ग येवला तालुक्यातून जातो.

या महामार्गावर येवला तालुक्यातील रायते शिवारात सुरतहून शिर्डीकडे दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर मोटारीला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर, चार जण जखमी झाले. मयत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही.

येवला तालुक्यात काही दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असताना तालुक्यातून जाणाऱ्या रस्तांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या चाऱ्याही पावसाच्या पाण्याने भरल्या आहेत. ऑक्टोबरच्या प्रारंभी पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे काही ठिकाणी माती टाकून भरण्यात आले होते. परंतु, दिवाळीपासून पुन्हा पाऊस सुरु झाल्यानंतर खड्ड्यांमधील माती बाहेर आली. रस्त्यांवर पुन्हा मोठे खड्डे तयार झाले. खड्ड्यांमधून बाहेर आलेली माती, खड्डे आणि पावसामुळे निसरडे झालेले खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. येवला तालुक्यातील एरंडगाव ते रायते या गावांदरम्यान बुधवारी पहाटे अपघात झाला.

सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्याने सुरतहून शिर्डी येथे दर्शनासाठी काही जण फाॅर्च्युनर या मोटारीने निघाले होते. येवला तालुक्यातील रायते शिवारात ही मोटार आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. मोटार भरधाव असल्याने काही कळण्याच्या आत मोटारीने तीन उलट्या घेतल्या. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले..जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये सुरत येथील साई भक्तांचा समावेश आहे. येवला तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

येवला येथे या महिन्याच्या पाच तारखेला घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. येवला तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चालकांकडून नियमांकडे होणारे दुर्लक्षही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. सध्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. तसेच पहाटेच्यावेळी दृश्यमानता कमी राहात असल्याने चालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

अपघातातील मृतांमध्ये पलक कापडिया, प्रणव देसाई, सुरेश कभीराज साहू यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरत येथील असल्याचे समजते.