नाशिक : गुन्हा करुन गुन्हेगार फरार होतात. पोलिसांना ते काही वर्ष सापडत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारही पोलिसांना आपण आता काही सापडत नाही म्हणून बिनधास्त राहतात. परंतु, पोलिसांनी ठरविल्यास ते काहीही करु शकतात, याचा अनुभव पुन्हा एकदा आला. पंचवटीतील किरण निकम हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरार असलेल्या आणि खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य गुन्हेगाराच्या नाशिक येथील गुंडाविरोधी पथकाने हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसक्या आवळल्या.
पंचवटीत निकम आणि उघडे या दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चवस्ववादातून कायमच वाद होत. १८ मे २०१७ रोजी पंचवटीतील नवनाथनगर येथे राहणारा निकम टोळीतील किरण राहुल निकम हा मोटारसायकलने जात असताना उघडे टोळीतील संतोष उघडे, संतोष पगारे यांनी त्याचा रस्ता अडविला. मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. गणेश उघडे, बंडू मुर्तडक आणि इतर काहीजणही त्या ठिकाणी आले. त्यांनी किरण निकम याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. याप्रकरणी निकमच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर गणेश उघडे, जितेश उर्फ बंडू मुर्तडक, संतोष पगार, सागर जाधव, संतोष उघडे, जयेश उर्फ जया दिवे , शाम पवार, विकास उर्फ विक्की पंजाबी, अनुपमकुमार उर्फ छोटू कनोजिया यांच्याविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात १९ मे २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश उर्फ बंडू संपत मुर्तडक यांना न्यायालयाने नऊ मे २०२३ रोजी जन्मठेप सुनावली. सदर गुन्ह्यात विकास उर्फ विक्की पंजाबी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असताना मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने त्यास अटक करण्याविषयी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकास आदेश दिले. पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण) , सहपोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकास त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
त्यानुसार सदर गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरार आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी याची माहिती काढण्यास पथकाने सुरुवात केली. तो मूळचा चंदीगड (पंजाब) येथील रहिवासी असून सध्या तो चंदीगड येथे असल्याची माहिती हवालदार विजय सूर्यवंशी, अंमलदार राजेश राठोड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार विक्की पंजाबीच्या २०१७ पूर्वीच्या मित्रांची माहिती काढण्यात आली. विक्की पंजाबी हा चंदीगड येथे हाॅटेल व्यवसाय करत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहपाोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे यांनी ीकाढली.
मिळालेल्या माहितीनुसार २१ ऑगस्ट २०२५ रोजी पथक चंदीगड येथे रवाना झाले. त्याठिकाणी त्याची माहिती काढली असता विक्की पंजाबी यास खलनायक म्हणून ओळखले जात असल्याचे समजले. तो बऱ्याच वर्षांपासून हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पुलघा गाव परिसरात हाॅटेल व्यवसाय करण्यासाठी गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानूुसार गुंडाविरोधी पथकाने कुल्लू जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या मणिकर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरी तालुक्यातील पुलघा या पहाडी गावात २३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे चार वाजता आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी (२९, बापूधाम, चंदीगड, पंजाब) यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अटक कुरुन कुल्लू येथील प्रथववर्ग न्यायालयात तात्पुरत्या पोलीस कोठडीसाठी (ट्रान्सिट रिमांड) हजर करण्यात आले. चार दिवसांची पोलीस कोठडी घेऊन नाशिक येथे आणण्यात आले. पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
खलनायकास पकडण्याची ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण), सहपोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठाेड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे यांनी पार पाडली.