जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वीच भाजपसह शिवसेनेने (एकनाथ शिंदे) स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाने भुसावळमध्ये शुक्रवारी तर जळगावमध्ये शनिवारी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठका आयोजित केल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव दोन्ही बैठका ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात आपापले राजकीय वर्चस्व वाढविण्यासाठी भाजप आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरू असतानाच तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काही दिवसांपासून सावध भूमिका घेतल्याचे चित्र दिसत होते. शरद पवार गटातील दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना पक्षात सामावून घेत अजित पवार गटाने भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का दिला होता. मात्र, त्यानंतरपक्षातील हालचाली खूपच मंद झाल्या होत्या. नवीन प्रवेश, मेळावे, आढावा बैठका किंवा संघटनात्मक उपक्रमांबाबत पक्षात पूर्वी असलेला उत्साह कमी झाल्याचे दिसत होते. पक्षाला आलेली ही मरगळ दूर करण्यासाठी संपर्कमंत्री माणिकराव कोकाटे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत त्यामुळे जिल्ह्यात शुक्रवारी तसेच शनिवारी आढावा बैठका घेतल्या जाणार होत्या.
मंत्री कोकाटे यांच्या उपस्थित होणाऱ्या आढावा बैठकांमध्ये जळगाव आणि रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि जळगाव महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार होती. उमेदवारी अर्ज भरून घेत इच्छुंकाच्या प्रभाव क्षेत्रात सध्या काय परिस्थिती आहे, हे देखील जाणून घेतले जाणार होते. त्या दृष्टीने अजित पवार गटाची रावेर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आढावा बैठक शुक्रवारी सकाळी साडेनऊला भुसावळ येथील संतोषी माता सभागृहात आयोजित केली होती. त्याच प्रमाणे जळगाव लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगावमधील जिल्हा कार्यालयात पार पडणार होती.
आढावा बैठकांना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, कैलास पाटील, दिलीप सोनवणे, प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांच्यासह इतरही बरेच तोलामोलाचे पदाधिकारी उपस्थित राहणार होते. त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व जय्यत तयारी दोन्ही ठिकाणी केली गेली होती. प्रत्यक्षात, मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रालयातील काही महत्वाच्या बैठकांमुळे शु्क्रवारी आणि शनिवारी उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याचा निरोप आला. त्यामुळे भुसावळसह जळगावमधील दोन्ही बैठका ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या. परिणामी, सर्वांचाच हिरमोड झाला. आता मंत्री कोकाटे यांच्या सोयीनुसार आढावा बैठकांच्या पुढील तारखा ठरविल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
