शहरातील पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा दावा करीत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे, या मागणीसाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सटाणा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. ‘शहर बंद’च्या आवाहनास संमिश्र प्रतिसाद मिळाला.
शुक्रवारी मध्यरात्री सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष विजय वाघ यांच्यासह ५० जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला करून जाळपोळ केल्याची तक्रार दाखल करून घेत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
दुसरीकडे हा सर्व प्रकार म्हणजे पोलिसांचे षड्यंत्र असून विजय वाघ यांच्यासह कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना व्यक्त करून रविवारी आ. दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहर बंदचे आवाहन केले होते.
त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुपारी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या वेळी आमदार चव्हाण यांनी आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना सादर केले.
मोर्चात आ. चव्हाण यांच्यासह तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, नगरसेवक काका रौंदळ, पांडुरंग सोनवणे, ज. ल. पाटील, नानाजी दळवी, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp march against nashik police
First published on: 11-04-2016 at 01:19 IST