या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ उपाध्यक्ष आणि सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव पदांसाठी प्रत्येकी १३ जणांचा समावेश असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी जाहीर केली. कार्यकारिणीत पक्षाच्या निष्ठावंतांसमवेत नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली असून आगामी काळातदेखील काही कार्यक्षम कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. पगार यांनी दिली. खजिनदारपदी आ. छगन भुजबळ यांचे विश्वासू दिलीप खैरे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका अलीकडेच झाल्या. त्यात जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झालेले अ‍ॅड. पगार यांनी पक्षाचे प्रथम प्रदेशाध्यक्ष व जिल्हा संपर्क नेते आ. छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हा कार्यकारिणीत समावेश झालेल्या पदाधिकाऱ्यांपैकी रोज दोन पदाधिकारी नाशिक येथील राष्ट्रवादी भवन या कार्यालयात त्यांना नेमून दिलेल्या दिवशी उपस्थित राहून पक्षाच्या कामकाजात व जनतेस मदत करतील. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुकांकरिता जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यानुसार निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचेही पगार यांनी म्हटले आहे. जिल्हा कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून पक्षाचे जिल्हा संपर्क नेते, जिल्ह्य़ातील पक्षाचे माजी मंत्री, आजी-माजी खासदार व आमदार, प्रदेश प्रतिनिधी, पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, जिल्ह्य़ातील पक्षाचे नगरपालिका व नगर पंचायतींचे अध्यक्ष व सदस्य यांचाही पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश राहील, अशी माहिती अ‍ॅड. पगार यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nashik district executive committee announced
First published on: 04-03-2016 at 01:00 IST