धुळे : सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांनी स्कॉर्पिओ मोटारीपुढे आणि मागे दुसरी वाहने उभी करून कोंडी केली. त्यानंतर गुजरातमधील दोघांच्या ताब्यातील दीड कोटी रुपये लुटून नेले. हा प्रकार धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावाजवळ झाला. या प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या अधीपत्याखाली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष पथक तयार करण्याचे सूचित केले आहे. पुरमेपाडा (ता.धुळे) शिवारातील उड्डाणपूलाजवळ असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरील मालवाहू वाहनांच्या गोदामासमोर पाच जुलै रोजी पहाटे घडलेल्या या घटनेची नोंद दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरा करण्यात आली
कल्पेश पटेल (४६) रा. प्रयोसा ड्रीम दिंडोली, सुरत) आणि भरतभाई भालिया (४२, रा.वावगाम, कामरेज, सुरत, गुजरात) हे दोघे मोटारीने धुळे-सुरत महामार्गावरून प्रवास करत धुळे तालुक्यातील पुरमेपाडाजवळ आले असता त्यांच्या मोटारीसमोर एक वाहन आडवे लावतानाच मागच्या बाजूनेही अन्य एक वाहन उभे करून गुजरातमधील दोघांच्या मोटारीला अडथळा निर्माण करण्यात आला. पुढे आणि मागे थांबलेल्या वाहनांमधून उतरलेल्या आठ जणांनी मोटारीला घेरले. पटेल आणि भालिया यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दीड कोटी रुपयांची रोकड बळजबरीने लुटून नेली. यासंदर्भात कल्पेश पटेल यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार समोर थांबलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट वाहनातून आणि मागील बाजूला उभ्या असलेल्या वाहनातून आठ अनोळखी व्यक्ती बाहेर पडल्यावर त्यांनी ही रक्कम लुटून नेल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी दरोडेखोरांचे वर्णन आणि भाषा तसेच अन्य आवश्यक माहिती घेवून पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत. या घटनेचा तपास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील हे करीत आहेत. धुळे तालुका पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा समांतर तपास सुरु केला असून यासाठी स्वतंत्र तपास पथकांना कामे सोपविण्यात आली आहेत. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही चित्रण मिळवून जप्त करण्यात आलेल्या मोटारीची तपासणी करण्यात येत आहे. दरोडेखोरांच्या हातांचे ठसे व काही पुरावे संकलित केले असल्याचेही म्हटले जात असून तक्रारदार कल्पेशभाई आणि भरतभाई यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
संबंधिताकडे नेमकी किती रक्कम होती हे ठाऊक नाही, पण जेवढ्या रकमेची दरोडेखोरांनी लूट केल्याचा आरोप आहे, ती रक्कम दीड कोटी एवढी आहे. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक निर्माण करण्यात आले असून तांत्रिक आणि अन्य बाबींच्या आधारे तपासाला गती देण्यात आली आहे. – श्रीराम पवार (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,धुळे)