लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) सत्यग्राही आणि सत्याग्रही होण्यासाठी सर्वांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. त्यासाठी लोकशिक्षण, आंतरराष्ट्रीय सहकार्य, जनआंदोलनाचा रेटा, संघर्ष करावा लागणार आहे. वीज, दूरसंचार क्षेत्र, अण्वस्त्र वापर निर्बंध, औषधनिर्माण शास्त्राच्या धर्तीवर एआय क्षेत्रात नियमनाची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

येथील दवप्रभा मीडिया वर्क्सच्यावतीने शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत सावंत यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) आणि माणूस यातील नातं समजून घेतांना..’ या विषयावर दहावे पुष्प गुंफले. शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात झालेल्या व्याख्यानास श्रोत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सभागृह तुडूंब भरले होते.

आणखी वाचा-नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाकडून संदीप गुळवे निश्चित; किशोर दराडेंना शह देण्याची तयारी

सावंत यांनी कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वाढत्या प्रभावाने सामान्यांच्या मनांत निर्माण झालेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधत मानवी बुध्दिमत्ता आणि कृत्रिम बुध्दिमत्तेतील फरक, प्रत्येकाची वैशिष्ठ्ये, वेगळेपणा व क्षमता विविध दाखले देत उलगडले. कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) मानवाचा शत्रू, वैरी वा रोजगारविनाशक आहे, या मानसिकतेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. एआय आपला स्पर्धक नाही. त्याला जे जमते ते आपल्याला जमत नाही आणि आपल्याला जे जमते ते त्याला जमत नाही. आता एआयबरोबर भागिदारी करायला शिकले पाहिजे. मानवी बुध्दिमत्तेला त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी लागेल, असा व्यामिष्ठतेचा काळ येणार आहे. दुसरीकडे एआयचा विकास करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेला पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मानवी बुध्दिची अंतप्रेरणा, उर्मी, इ्च्छाशक्ती, मनोधैर्य, निर्णय क्षमता ही खास वैशिष्ठ्ये आहेत. सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, बुध्दिचातुर्य, भावनिक बंध अशा अनेक गोष्टी एआयकडे नाहीत. परंतु, या तंत्रज्ञानाची मानवाला जे अशक्य आहे, ते करण्याची क्षमता आहे. बहुभाषांमध्ये भाषांतर, माहितीची क्षणार्धात सखोल पडताळणी करून विश्लेषण, स्वत:चे अद्ययावतीकरण ते करू शकते. विज्ञानाची दिशा एआयने बदलली. ग्राहक म्हणून प्रत्येकाला सुरक्षित, पारदर्शक व जबाबदार एआयसाठी आग्रही रहावे लागणार असल्याचे सावंत यांनी नमूद केले. प्रारंभी, प्रा. वृन्दा भार्गवे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणाऱ्या माहितीपटाचे सादरीकरण झाले. प्रमोद भार्गवे यांनी स्वागत केले.

आणख वाचा-भुसावळ दुहेरी हत्याकांड : तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागास जिल्ह्यात मुलींच्या साक्षरतेसाठी वापर शक्य

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्राचा प्रभावीपणे वापर करता येईल. देशातील १२ वर्षाखालील मुलींना साक्षर करता आले तर, ती अतिशय महत्वाची बाब ठरेल. कारण, शिक्षण न घेणाऱ्या मुलींची लवकर लग्न होतात. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. देशातील मागासलेल्या जिल्ह्यांतील १२ वर्षाखालील मुलींना साक्षर करण्यासाठी आतापर्यंतचे प्रयत्न निष्फळ ठरले. देशाच्या कृती आराखड्यात आता त्याचा अंतर्भाव झाल्याचे सावंत यांनी सांगितले. कृषीसह अन्य क्षेत्रात या तंत्राचा कसा वापर करता येईल, यावर त्यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात भाष्य केले. देशात कॉर्पोरेट कर २५ टक्के आहे. तो वाढविल्यास देशातील विषमता मोठ्या प्रमाणात कमी होईल. ज्या राष्ट्रात हा कर अधिक आहे, तिथे विषमता कमी असल्याचा दाखला त्यांनी दिला.