जळगाव – जिल्ह्यातून दररोज हजारो प्रवासी पुणे येथे जातात. जळगावहून थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना अवघ्या काही तासात पुण्यात पोहोचणे शक्यही झाले आहे. मात्र, विमानसेवेला मर्यादा असल्याने प्रवाशांना रेल्वेसह एसटी तसेच खासगी बसेसवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यातही गर्दीच्या हंगामात बऱ्याचवेळा जागा मिळत नाही. ही स्थिती लक्षात घेता जळगावमार्गे नव्याने सुरू झालेली रेल्वे गाडी प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून फ्लाय ९१ या विमान कंपनीने गोवा, हैदराबाद आणि जळगाव दरम्यान थेट विमानसेवा सुरू करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर जळगावकरांकडून पुणे मार्गावरही विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्याची दखल घेऊन फ्लाय ९१ कंपनीने जळगाव–पुणे विमानसेवा सुरू देखील केली आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि खासगी कारणांस्तव पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी गैरसोय दूर झाली आहे.
मात्र, आठवड्यातून ठराविक दिवस असलेल्या विमानसेवेला खूपच मर्यादा आल्या आहेत. अशा या परिस्थितीत भुसावळ-पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी खूपच सोयीची ठरली होती. मात्र, मध्य रेल्वेच्या प्रशासनाने ती गाडी भुसावळऐवजी थेट अमरावतीहून सोडण्याचा निर्णय घेतला. इतर बऱ्याच लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या जळगावमार्गे पुणे जात असल्या, तरी त्यांना जळगाव स्थानकावर थांबा नाही. प्रवाशांसमोर त्यामुळे एसटी किंवा खासगी निमआराम बसने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. असे असताना, मध्य प्रदेशातील रेवा ते हडपसर (पुणे) दरम्यान सुरू झालेल्या नवीन साप्ताहिक रेल्वे गाडीमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळू शकणार आहे.
२०१५२ रेवा-हडपसर (पुणे) साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दर बुधवारी सकाळी ०६:४५ वाजता रेवा स्थानकावरून सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०९:४५ वाजता सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नैनपूर, बालाघाट, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौड कॉर्ड लाईन मार्गे हडपसर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात २०१५१ हडपसर- रेवा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडी दर गुरुवारी पुणे स्थानकावरून दुपारी ०३:१५ वाजता सुटेल आणि शुक्रवारी दुपारी ०५:३० वाजता रेवा येथे पोहोचेल. या साप्ताहिक गाडीत एकूण २० एलएचबी डबे असतील. ज्यामध्ये चार द्वितीय श्रेणी आसनी, तीन तृतीय श्रेणी एसी, तीन तृतीय श्रेणी एसी इकॉनॉमी, दोन द्वितीय श्रेणी एसी आणि उर्वरित शयनयान प्रकारातील डबे असतील.