नववर्षांत पारा १० अंशांवर

नववर्षांच्या सुरुवातीला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून थंडी अंतर्धान पावली आहे. मागील आठवडय़ात ५.४ पर्यंत खाली उतरलेल्या नाशिकच्या तापमानात नववर्षांच्या पहिल्या दिवशी जवळपास दुपटीने वाढ होऊन ते १०.१ अंशावर पोहोचले. वातावरणातील गारवा कमी झाल्याचा परिणाम नववर्ष स्वागताच्या उत्साहावर झाला. थंडीची लाट ओसरल्यामुळे धास्तावलेल्या द्राक्ष उत्पादकांनी तूर्तास सुस्कारा सोडला आहे.

डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात नाशिकमध्ये थंडीची लाट आली होती. सलग तीन ते चार दिवस तापमान पाच ते सहा अंशाच्या दरम्यान राहिल्यामुळे चांगलाच गारवा जाणवत होता. या स्थितीत बोचरा वारा वाहत असल्याने हुडहुडी भरविणाऱ्या थंडीची प्रचिती आली. नववर्षांत प्रवेश करण्याची घटिका जवळ येत असताना वातावरणातील या बदलांनी सर्वसामान्य सुखावले. ‘थर्टी फर्स्ट’पर्यंत गारवा कायम राहिल्यास नववर्षांचे स्वागत जल्लोशात करता येईल, अशी सर्वाची धारणा होती.

त्यादृष्टीने अनेकांनी नियोजनही केले, परंतु अखेरच्या दोन ते तीन दिवसांत वातावरणात झपाटय़ाने बदल झाले. गेल्या शुक्रवारी ५.४ अंशापर्यंत खाली घसरलेले तापमान या शुक्रवारी १०.१ अंशावर पोहोचले. डिसेंबरमध्ये नीचांकी तापमानाचे काही दिवस वगळता अनेक दिवस तापमान याच पातळीत राहिले. मागील आठवडय़ात दिवसाही उबदार कपडे परिधान करणाऱ्यांना या सप्ताहात दुपारी काहीसा उकाडा जाणवला. थंडीची लाट गायब झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला. कडाक्याच्या थंडीमुळे उत्पादकांमध्ये धास्ती पसरली होती. थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यासह द्राक्षाचे उत्पादन घेणाऱ्या पट्टय़ात रात्रभर शेकोटय़ा पेटवत त्यांना द्राक्ष बागांना थंडीपासून वाचविण्याची धडपड करावी लागली होती. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष घडात पाणी साचते. त्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. जिल्ह्य़ातील निफाड, नाशिक, दिंडोरी आदी तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत.

या पट्टय़ात शेतकऱ्यांना रात्र अक्षरश: जागून काढावी लागली. काही विशिष्ट अंतरावर ठिकठिकाणी शेकोटी पेटवून द्राक्ष घडांसाठी उबदार वातावरण तयार करणे भाग पडले. गारवा कमी झाल्यामुळे उत्पादकांना काहीशी विश्रांती मिळाली आहे