नाशिकमधील गोदावरीतील दुतोंड्या मारूती जवळ पुराच्या पाण्यात ६५ वर्षीय वृध्दाने सोमवारी सकाळी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे जीवरक्षकाने पाण्यात उडी मारून वृद्धाचा जीव वाचवला. गोपीनाथ कोंडाजी त्रिभुवन (६५) असे या वृध्दाचे नाव आहे. मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

मुलगा आणि सुनेकडून मानसिक छळ

सध्या नाशिमधील सिडकोतील लेखानगर येथे वास्तव्यास असणारे त्रिभूवन मूळचे वैजापुरचे आहेत. सकाळी ते रामकुंड परिसरात आले होते. मुसळधार पावसामुळे सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दुतोंड्या मारुतीजवळ त्रिभूवन यांनी गोदा पात्रात उडी घेतली. हा प्रकार जीवरक्षक दीपक कुरणे यांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुरात उडी घेतली. रामसेतू पुलाजवळ त्रिभुवन यांना पाण्यातून बाहेर काढले. मुले व सुन मानसिक छळ करीत असल्याने आपण आत्महत्येच्या निर्णय घेतला आल्याचे त्रिभुवन यांनी सांगितले.