नाशिक: तरुणाई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधत असताना दुसरीकडे या क्षेत्रात कार्यरत नाशिकमधील ओम महाजन हा युवक ही नोकरी सोडून भारतीय नौदलात अधिकारी होणार आहे.
ओमची भारतीय नौदलात ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ हवाई वाहतूक नियंत्रक (एअर ट्राफिक कंट्रोलर) म्हणून सबलेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याला नुकतेच नौदल मुख्यालयातून नियुक्तीपत्र मिळाले. पुढील महिन्यात तो भारतीय नौदल प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे. सेंट लॉरेन्स शाळेचा तो माजी विद्यार्थी आहे. त्याने माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
इयत्ता अकरावीपासून हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्यदल अधिकारी पदासाठीच्या विविध परीक्षा व मुलाखतीची तयारी करत होता. ओमची आई विद्या पाटील-महाजन या डी. एस. आहेर विद्यालयात मुख्याध्यापिका असून वडील सुनील माळी-महाजन हे नाशिक ग्रामीण पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्याची बहीण बँक ऑफ इंडियात माहिती तंत्रज्ञान अधिकारी आहे. ओमने माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र सोडून नौदलात अधिकारी होण्याच्या निर्णयाने देशभरातील युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.