नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या वतीने चंदनाच्या उटी वारी सोहळ्याला गुरूवारी उत्साहात सुरुवात झाली. देवस्थानचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, वारकरी यांच्या उपस्थितीत उटी लेपण करण्यात आले. शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने उत्सवाचा समारोप होणार आहे.

उटीची वारी सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे दोनशेपेक्षा अधिक दिंड्या दाखल झाल्या. प्रतिवर्षी वरुथिनी एकादशीला निवृतीनाथांच्या समाधीस उष्म्याचा त्रास होऊ नये, या भावनेने वारकरी ही उटी चंदनाच्या खोड सहाणेवर उगाळून तयार करतात. यंदाही उटीची वारी सोहळ्यासाठी चंदनाचे खोड उगाळून सुगंधी उटी तयार करण्यात आली. दरम्यान, यानिमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

गुरूवारी सकाळपासूनच वारकऱ्यांची पाऊले संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराकडे वळण्यास सुरूवात झाली. राम कृष्ण हरीच्या जयघोषात दिंड्या मंदिराच्या आवारात आल्या. दुपारी दोन वाजता निवृत्तीनाथांच्या समाधीस चंदनाची उटी लावण्यास प्रारंभ झाला. रात्री साडेआठ ते साडेदहा या वेळेत चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन झाले. रात्री ११ वाजेनंतर वडगाव पिंगळा येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रींच्या समाधीची पूजा करून उटी उतरवून भाविकांना द्रवरूप स्वरूपात वाटण्यात येणार आहे. शुक्रवारी काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसाद वाटपाने उत्सवाचा समारोप होणार आहे.