जळगाव : शासन अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांद्वारे सुमारे ७५ हजार तरूणांना स्वयंरोजगार आणि रोजगाराभिमुख व्यवसायांचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच ग्रामीण युवकांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून उद्योजक बनण्याची संधी देण्यात येणार आहे. ज्यामुळे राज्यात हजारो उद्योजक घडतील, असा विश्वास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स (नवउद्यमी) असणारे राज्य असून, शासनाच्या नव्या धोरणानुसार आता ग्रामीण भागातील हजारो तरूणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून उद्योजक बनण्याची संधी मिळणार आहे. विकासाची दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विकास विभागाने स्टार्टअप्स आणि अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांसंदर्भात नवे धोरण अंमलात आणले आहे. त्यात ग्रामीण भागातील युवकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यातील धरणगावात डॉ. हेडगेवार नगरात क्रांतिवीर खाजा नाईक स्मृती संस्थेतर्फे आयोजित मुकुंदराज पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्राचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यानंतर मंत्री लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रमुखांसह पंडित दिनदयाल उपाध्याय हिरक महोत्सव समिती सदस्य तसेच आय. एम. सी. सदस्यांची बैठक देखील मंत्री लोढा यांनी घेतली. या निमित्ताने काही महत्वाच्या घोषणा त्यांनी केल्या. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान अंतर्गत टेलिकॉम एसएससीव्दारे सुरू करण्यात येणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती दिली. ज्यामध्ये मोबाईल फोन हार्डवेअर दुरूस्ती, डिजिटल मित्र मल्टी स्कील टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस) आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र डीपीसी नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत सुरू करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजने अंतर्गत संस्थेच्या दोन महिलांना स्टार्टअपसाठी प्रत्येकी १० लाख रूपयांचे आर्थिक साह्य मंजूर केले जाणार आहे.

या व्यतिरिक्त, मुख्यमंत्री उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत पाच लाखांपर्यतची मदत संस्थेने शिफारस केलेल्या उमेदवारांना देण्यात येईल. तसेच राज्यातील ७५ हजार तरूणांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन येईल. राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून विविध भागात एक हजार रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा कार्यक्रम राबवून राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७५० गावात स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले, त्याचीही माहिती मंत्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.