नाशिक : अर्थव्यवस्थेचा आकार विस्तारण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावणारे प्रश्न, अडचणी लक्षात घेऊन त्यांची सोडवणूक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन उद्योग विश्वातील घडामोडी, लघु-मध्यम उद्योग क्षेत्रासमोरील आव्हाने, समस्या आणि उपाय यांवर मंथन करण्यासाठी नाशिक येथे गुरुवारी (१७ ऑगस्ट) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह २०२३’ या उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, ‘मऔविम’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह नाशिकच्या उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक या परिषदेत सहभागी होणार आहेत.

सुवर्ण त्रिकोणातील एक कोन असलेल्या नाशिकला उद्योग विकासात मोठी मजल मारणे शक्य आहे. स्थानिक पातळीवर बॉश, मिहद्रा, इप्कॉस, एबीबी, जिंदाल (सिन्नर आणि इगतपुरी), सॅमसोनाइट, ग्लॅक्सो, तापडिया टूल्स, सीएट टायर्स आदी उद्योग असून गेल्या काही वर्षांपासून नव्या बडय़ा उद्योगांची प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह सहकारी औद्योगिक संस्थांच्या वसाहती आहेत. यात मुख्यत्वे वाहन, इलेक्ट्रिक क्षेत्रातील मोठे उद्योग आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योजकांची संख्या पाच हजारहून अधिक आहे. त्यामुळे उद्योग विश्वाला भेडसावणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात कार्यरत औद्योगिक संघटनांच्या सहभागाने लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह या उद्योग परिषदेतून उद्योजक, विश्लेषक, सरकारचे प्रतिनिधी यांच्यात व्यापक चर्चा घडविण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमात नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा), नाईस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, लघुउद्योग भारती, उद्योग आणि निर्यातदार, वाइन उत्पादक, अपारंपरिक ऊर्जा उत्पादक, आयटी, स्त्री उद्यमी आदी संघटना तसेच सहकारी औद्योगिक विकास वसाहतींचा नाशिक विभागीय औद्योगिक वसाहत संघ, मालेगावातील यंत्रमागधारक संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही उद्योग परिषद केवळ निमंत्रितांसाठीच आहे.

सहभाग..

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, ‘मऔविम’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह नाशिकचे नामांकित उद्योजक ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह २०२३’ या परिषदेत सहभागी होतील. ही उद्योग परिषद फक्त निमंत्रितांसाठीच आहे.

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ