मोहिमेसाठी ९० शिक्षकांची ‘बालरक्षक’ म्हणून नियुक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीनंतर येणारी थंडीची लाट आणि शेती कामांना येणारा वेग यामुळे आदिवासीबहुल पट्टय़ात स्थलांतराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असते. स्थलांतराच्या या प्रक्रियेत कुटुंबे देशोधडीला लागत असताना अनेक विद्यार्थी शाळाबाह्य़ होतात. यंदा जिल्ह्य़ावर दुष्काळाचे सावट आहे. उदरनिर्वाहासाठी बाहेर पडणाऱ्या कुटुंबाची संख्या पाहता शिक्षण विभागाने दिवाळीआधीच शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. या मोहिमेसाठी ९० शिक्षकांची ‘बालरक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा प्रश्न दिवसागणिक जटील होत आहे. वेगवेगळ्या मोहिमेच्या माध्यमातून शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे किमान प्राथमिक शिक्षण त्यांना मिळावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. कौटुंबिक बिकट आर्थिक स्थिती, रोजगाराविषयी असणारी अस्थिरता, मुलांची सुरक्षा अशा वेगवेगळ्या कारणाने ग्रामीण विशेषत: आदिवासी पट्टय़ात शाळाबाह्य़ होण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरीकडे, जिल्ह्य़ात राज्यातील बीड, यवतमाळ, सातारा, सांगली परिसरांसह इतर ठिकाणांहून कुटुंबे निफाडसह अन्य ठिकाणी शेतीच्या कामासाठी दाखल होतात. त्यांच्यासमवेत त्यांची मुले असतात. अशा संवेदनशील भागांचा अभ्यास करून यंदा मुले शाळाबाह्य़ होऊ नये यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. यासाठी हंगामी वसतिगृहांसह इतर योजना आहेत. या माध्यमातून स्थलांतरित होणाऱ्या बालकांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे गावात ठेवण्यात येत असून या बालकांची सकाळची न्याहारी, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारी माध्यान्ह भोजनच्या माध्यमातून बालकांना जेवण देण्यात येत आहे. आजवर या योजनेचे अनेक विद्यार्थी लाभार्थी ठरले आहेत. यंदा मात्र दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतांना वरिष्ठ स्तरावरून या संदर्भात नियोजन नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नुकतेच या संदर्भात कार्यशाळेद्वारे शिक्षकांचे प्रबोधन केले आहे.

कार्यशाळेत ९० शिक्षकांची ‘बालरक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विद्यार्थी शाळाबाह्य़ होऊ नये यासाठी पालकांचे मतपरिवर्तन करण्यावर भर देण्याचे सूचित करण्यात आले आहे. बालरक्षक तालुकास्तरावर आपआपल्या परिसरातील शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध घेणार आहेत. यासाठी पुढील टप्प्यात प्रत्येक गट पातळीवर पाच शिक्षकांचे एक पथक, याप्रमाणे पथके तैनात करून ही शोध मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. या गटपातळीवरील शिक्षकांना बालरक्षक मार्गदर्शन करतील, अशी माहिती सर्वशिक्षा अभियानाचे प्रकल्प समन्वयक प्रवीण जाधव यांनी दिली. शाळाबाह्य़ मुलांचा शोध घेत जे बाहेरगावहून आले, त्यांना जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्यात येत आहे.

 शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक

बेताची आर्थिक परिस्थिती, गावपातळीवर रोजगाराचे साधन नसल्याने स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. आदिवासीबहुल भागातून बाहेरील जिल्ह्य़ात जाणाऱ्यांची संख्या जास्त, तर निफाड, वणी यांसारख्या बागायती ठिकाणी बाहेरगावाहून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी जिल्ह्य़ातून एक हजार १०६ शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना शाळेत पुन्हा दाखल करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Out of school children surveys at nashik
First published on: 16-10-2018 at 02:59 IST