नाशिक : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. नाशिक विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत मागील सात महिन्यांत ३५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाख पाच हजार रुपयांची वैद्यकीय मदत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात कागदपत्रविरहित व डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा कक्षांची स्थापना केल्यामुळे रुग्णांना मंत्रालयात धाव घेण्याची गरज राहिलेली नाही. २० गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते, त्यात कॉक्लियर इम्प्लांट (वय दोन ते सहा वर्षे), हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, बोनमॅरो प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात, मेंदूचे आजार, हृदयरोग, बालकांची शस्त्रक्रिया, नवजात शिशुंचे आजार तसेच भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त आदी रुग्णांच्या उपचाराकरिता मदत केली जाते.
यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, जिओ-टॅग छायाचित्र (रुग्ण दाखल असल्यास अनिवार्य), उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न एक लाख ६० हजारापेक्षा कमी असावे), वैद्यकीय अहवालासह खर्चाचे प्रमाणपत्र, संबंधित रुग्णालयाची संगणक प्रणालीवरील नोंद आदी कागदपत्रे आवश्यक ठरतात. अधिक माहितीसाठी १८००१२३२२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कागदविरहित प्रणाली, डिजिटल तंत्रज्ञान आणि जिल्हास्तरीय कक्षांमुळे गरजू रुग्णांना सहज मदत पोहोचविणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्षांमुळे रुग्ण व नातेवाईकांच्या अनेक समस्या सहज सोडविणे शक्य होत आहे. आता त्यांना अर्ज करण्याबरोबर वैद्यकीय आर्थिक मदत मिळविणे सोपे झाले आहे. – रामेश्वर नाईक (कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष)
जिल्हानिहाय आकडेवारी
एक जानेवारी ते ३१ जुलै २०२५ या सात महिन्याच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील १०३९ रुग्णांना १० कोटी ३५ लाख २४ हजार रुपयांची मदत मंजूर झाली. जळगाव जिल्ह्यात ७९५ रुग्ण (सहा कोटी ९९ लाख ४५ हजार रुपये मदत), धुळे जिल्ह्यातील ९५ रुग्ण (८० लाख ३१ हजार), नंदुरबार जिल्ह्यातील ३८ रुग्णांना ३९ लाख ५५ हजार तर अहिल्यानगर जिल्ह्यात १५७५ रुग्णांना १३ कोटी ७७ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.