जळगाव : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये २३ तारीख अखेर अतिवृष्टीसह पुरामुळे सुमारे ८० हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने ८३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्यामुळे ३२३ गावांमधील एक लाखाहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत.

३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याने २३ सप्टेंबरअखेर कपाशी, केळी, कांदा, सोयाबीन, मका, भाजापाला आणि फळपिकांचे सुमारे ८० हजार हेक्टरचे नुकसान होऊन ५१८ गावांमधील एक लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले होते. तसेच पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पाचोरा तालुक्यात तिघांचा, भुसावळ व मुक्ताईनगर प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश होता. १९२२ पशुधन मृत्युमुखी पडले असून, १०६८ घरांची पडझड झाली. याशिवाय, ६८७ घरांत पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. कृषी व महसूल विभागाकडून पिकांसह घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच शनिवारी सायंकाळनंतर रविवारी सकाळपर्यंत चाललेल्या पावसामुळे पुन्हा हाहाकार उडाला. नदी व नाल्यांना मोठे पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. शिल्लक राहिलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या.

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात एकूण २२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली. पैकी चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक सात मंडळात अतिवृष्टी झाली असून, चार मंडळात तर १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातही आठ मंडळात अतिवृष्टी झाली. कृषी व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीत शनिवार आणि रविवार या दोन दिवसात सुमारे ८३ हजार ७२४ हेक्टरवरील केळी, कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन, कांदा, भाजीपाला आणि इतर फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पैकी सर्वाधिक ५३ हजार ११६ हेक्टर कपाशी, २२ हजार ४३९ हेक्टर मका, १८४३ हेक्टर सोयाबीन, १८०८ हेक्टर ज्वारी-बाजरी, १०७४ हेक्टर केळी-पपई, ८०१ हेक्टर भाजीपाला आणि १२८८ हेक्टरवरील इतर फळपिकांचे नुकसान झाल्याची नोंद घेतली गेली आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वात जास्त ५६ हजार ७८१ हेक्टरचे नुकसान होऊन १३७ गावांमधील ७३ हजार ९९८ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच धरणगाव तालुक्यात १४ हजार ८७६ हेक्टरचे नुकसान होऊन ९० गावांमधील २२ हजार ५०० शेतकरी बाधित झाले आहेत. याशिवाय एरंडोल तालुक्यात ६४४६ हेक्टर आणि पाचोरा तालुक्यात ५३५७ हेक्टरचे नुकसान झाल्याने ६४ गावांमधील ११ हजार ८६० शेतकरी बाधित झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.