जळगाव – पाचोऱ्याचे माजी आमदार दिवगंत आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी वैशाली सुर्यवंशी यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढल्यानंतर बहीण-भावातील संबंध आधीच ताणले गेले होते. त्यानंतर आता दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे.

जिल्ह्यात शिवसेनेला (उध्दव ठाकरे) पडत्या काळात साथ देणाऱ्या अनेक निष्ठावानांनी आधीच पक्षाची साथ सोडली असताना, वैशाली सुर्यवंशी यांनीही भाजपमध्ये गेल्या महिन्यात प्रवेश केला. त्यांच्यासोबत पाचोरा तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटासाठी तो एक मोठा धक्का होता. गेली दोन पंचवार्षिक शिवसेनेचे उमेदवार आमदार किशोर पाटील हे विरोधी पक्षांशी लढा देत होते. मात्र, या वेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या बहिणीशी लढा द्यावा लागला.

कधीकाळी एकत्र फिरणारे बहीण-भाऊ निवडणूक प्रचारात एकमेकांवर जोरदार आरोप करताना दिसून आले. प्रत्यक्षात वैशाली सुर्यवंशी यांना भावाकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी ठाकरे गट सोडून अचानक भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या पक्षातंराविषयी मतदारसंघात गैरसमज पसरविण्यात येत असल्याचे लक्षात घेऊन वैशाली सुर्यवंशी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाऊ आमदार किशोर पाटील यांच्यावर बरेच गंभीर आरोप केले होते. मी खोके घेऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. टक्केवारीचे पैसे घेऊन गब्बर झालेली नाही. माझे राजकारण अतिशय स्पष्ट, पारदर्शी आणि लोकहिताचे आहे. मी भाजपमध्ये जाताना कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलेले नाही किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडलेला नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतक यांचा सल्ला घेऊनच पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स यांना घाबरून पक्षांतर केलेले नाही, असे वैशाली सुर्यवंशी यांनी आमदार भावाला लक्ष्य करताना म्हटले होते.

त्यावेळी आमदार पाटील यांनी बहिणीला प्रत्युत्तर देणे टाळले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर आता त्यांनी वैशाली सुर्यवंशी यांना उत्तर दिले आहे. माझ्याच बहिणीला प्रवेश देऊन भाजपने मला अडचणीत आणलेले नाही, उलट आमची महायुती आणखी मजबूत झाली आहे. पाचोऱ्यात आता विरोधी पक्षच शिल्लक राहिलेला नाही, असे आमदार पाटील म्हणाले.

आमच्या बहिणीला शिवसेनेत (उद्धव ठाकरे) जाऊन जेमतेम तीन वर्षे झाली असतील. त्या माझ्यावर तेव्हापासून सातत्याने आरोप करत होत्या. त्यांनी माझ्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढली. उद्धव ठाकरे यांना पाचोऱ्यात आणले. त्यांना सुमारे ६० हजार मते देखील पडली. त्या सर्व मतदारांचा विश्वासघात त्यांनी पक्षांतर करून केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानंतर नेमकी त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. त्यामुळे त्यांना निवडणुकीत साथ देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे, अशी टीका आमदार पाटील यांनी बहीण वैशाली सुर्यवंशी यांच्यावर केली.