नाशिक – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. प्रतिक्षा यादीतील प्रवेश सुरू असून सर्व्हरवर ताण पडून संथपणा येऊ शकतो. पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील बालकांसाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत विविध माध्यमांतील शाळांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४०७ शाळांमध्ये पाच हजार २९६ जागा उपलब्ध आहेत. यासाठी १७,३८५ अर्ज आले. पहिल्या यादीत यातील पाच हजार तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना नोंद केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात, आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रतदेखील घेऊन जावी, अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रक्रियेत शाळांकडून पालकांची लूट करण्यात येत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. नाशिक पॅरेंटस असोसिएशनच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देत या प्रक्रियेतील चुकीच्या पध्दती आणि गैरप्रकार दूर करण्याची अशी मागणी करण्यात आली आहे. याविषयी संघटनेचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून विशेष तपासणी पथकाची नियुक्ती करावी, अनियमित पध्दतीने अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, चुकीच्या पध्दतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, आदी मागण्या केल्या. शिक्षण विभागाकडून लेखी तक्रारी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.