नाशिक: वाहनांची संख्या वाढत असताना शहरात पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहतुकीशी निगडित विविध समस्या उद्भवत आहेत. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मुंबईत वाहनतळ प्राधिकरण स्थापन केलेले आहे. त्याच धर्तीवर नाशिक शहरात अभ्यासांती तसा विचार केला जाईल, असे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी सांगितले. महापालिकेवर अडीच हजार कोटींचे दायित्व असल्याने विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. स्मार्ट सिटीच्या कामांवरही लक्ष दिले जाईल. तसेच नाशिकला उद्योगस्नेही शहर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आर्थिक दुर्बल घटकांसाठी दिल्या जाणाऱ्या सदनिकांची माहिती म्हाडाला देण्यात दिरंगाई केल्यावरून विधीमंडळातील चर्चेनंतर पालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. रिक्त झालेल्या पालिका आयुक्त पदावर मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. नवे आयुक्त पवार यांनी सकाळी आयुक्त अर्थात प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेत येताना त्यांनी स्मार्ट रस्त्यावरील सीबीएस चौकातील स्थितीचे अवलोकन केले. वाहनतळाअभावी नाशिकमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्मार्ट सिटी योजना वाहनतळाचा विषय मार्गी लाऊ शकली नाही. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर पवार यांनी मुंबईत वाहनतळाच्या नियोजनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याचे नमूद केले. मुंबई महापालिकेतील जे चांगले उपक्रम आहेत, ते  नाशिकमध्ये राबविले जातील. नाशिकला उद्योग, व्यवसायस्नेही शहर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कुठलेही शहर उद्योग, व्यवसायासाठी पोषक होण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची ठरते. उद्योग, व्यवसायात गुंतवणुकीपूर्वी उपरोक्त शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, गटार व्यवस्था आदी सुविधांचा विचार केला जातो. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास, कचरामुक्त शहर यातून संबंधितांना सहजपणे व्यवसाय करता येईल, अशी व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतलेली अनेक कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. यावर पवार यांनी स्मार्ट सिटीचा कारभार आणि कामांवर लक्ष दिले जाईल, याची हमी दिली. सीबीएस वा तत्सम चौकात फार काही खर्च न करता सुशोभीकरण करता येईल. नमामि गोदा आणि अन्य महत्त्वाचे प्रकल्प पुढे नेले जातील. म्हाडा सदनिका हस्तांतरणाची कुठलीही कागदपत्रे अद्याप आपण पाहिलेली नाही. त्याचा अभ्यास करून सविस्तर उत्तर दिले जाईल. राजकीय प्रश्नांवर भाष्य करणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

महापालिकेवर  अडीच हजार कोटींचे दायित्व                                     

आर्थिक शिस्त गरजेची  महापालिकेवर सद्यस्थितीत अडीच हजार कोटींचे दायित्व आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त आणावी लागेल. कार्यारंभ आदेश दिलेली कामे थांबविली जाणार नाहीत. परंतु, या कामांचे प्राधान्यक्रम निश्चित केले  जातील. अंदाजपत्रकात तरतूद असेल तेव्हाच कार्यारंभ आदेश दिले जातात. आधीच्या प्रशासनाने त्याचा विचार केला असेल. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अन्य स्त्रोतांचा शोध घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले. थकबाकी वसुलीसाठी पाणी जोडणी खंडित केली जात असल्याबाबत मोठय़ा थकबाकीदारांकडील वसुलीकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी मांडली.

स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नाशिकसाठी प्रयत्न

नाशिक हे स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ शहर व्हावे, हा आपला मानस आहे. शहर कचरामुक्त करण्याकडे लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या महापालिकेकडून चांगले रस्ते, पदपथ, स्वच्छता अशा अपेक्षा असतात. त्यादृष्टीने प्राधान्यपूर्वक काम केले जाईल, असे पवार यांनी नमूद केले.