जळगाव: विधानसभेच्या निवडणुकीत सर्व ११ मतदारसंघात घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जिल्ह्यास तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यापैकी शिवसेनेकडे (एकनाथ शिंदे) पालकमंत्रीपद असताना, त्याच पक्षाच्या आमदारांना आता विकास निधीपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे. याबद्दल शिंदे गटाच्या काही आमदारांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी पाच मतदारसंघातील जागा भाजपसह शिंदे गटाच्या उमेदवारांनी तर एकमेव अमळनेरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाने लढवली होती. प्रत्यक्षात, सर्व जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून महायुतीने आपला दबदबा सुद्धा कायम राखला. सत्ता स्थापनेनंतर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील यांच्यात स्पर्धा होती. मात्र, अपेक्षेनुसार मंत्री पाटील यांची त्या पदावर वर्णी लागली.
आधी शिवसेना ठाकरे गटात, त्यानंतर शिंदे गटात असताना मंत्री पाटील यांनी सलग दोन वेळा जळगावचे पालकमंत्रीपद भूषविले होते. फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आता तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा मंत्री पाटील बाळगून होते. मात्र, महाजन आणि सावकारे यांनीही पालकमंत्रीपदासाठी आपणही दावेदार असल्याचे जाहीरपणे सांगितल्यानंतर मंत्री पाटील यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, जळगाव जिल्ह्याची चावी शेवटी त्यांच्याकडेच आली.
असे असताना, महायुतीचे घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आमदारांना कमी आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) आमदारांना विकास निधीसाठी जास्त भांडावे लागत आहे. त्याची प्रचिती जळगावमध्ये शुक्रवारी आयोजित नियोजन समितीच्या बैठकीतही आली. जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे असल्याने बैठकीत कोणी विरोधक नव्हता. तरीही नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार खंडाजंगी झाली. जिल्हा नियोजनचा निधी योग्य ठिकाणी खर्च न करता भलत्याच ठिकाणी परस्पर खर्च केला जात असल्याच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सर्वप्रथम लक्ष वेधले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेला निधी आमदारांची कोणतीही परवानगी न घेता परस्पर वारकरी भवनासह जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन मशिन, शासकीय इमारतींच्या दुरूस्तीसाठी खर्च केला गेल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.
आपल्याच पक्षाच्या (शिंदे गट) आमदाराकडूनच घरचा आहेर मिळाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच संतापले. आपण पाच वर्षात खर्च झालेल्या निधीचा हिशेब देऊ शकतो, असे सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वादात चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनीही उडी घेतली. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि तुम्हाला आमचे म्हणणे ऐकून घ्यावेच लागेल, असे खडसावून सांगितले. याच दरम्यान सांगा मग तुमच्या देवाभाऊला, असे विधान पालकमंत्री पाटील यांनी केले. त्यामुळे आमदार चव्हाण संतापल्याने सभागृहाचे वातावरण आणखी जास्त तापले. या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा आहे.