जळगाव : विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने या गाडीच्या अधिकृत वेळापत्रकासह डब्यांची रचना सुद्धा जाहीर केली आहे. दरम्यान, वंदे भारतच्या डब्यांची मर्यादीत सीट क्षमता लक्षात घेता या गाडीत जळगावसह भुसावळच्या प्रवाशांना जागा मिळते की नाही, त्याबद्दल शंका व्यक्त होत आहे. 

मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २६१०२ अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनीहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ०९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. तर २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) पुण्याहून सकाळी ६:२५ वाजता निघेल आणि सायंकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही गाडी सोमवारी अजनीहून आणि मंगळवारी पुण्याहून वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल.

प्रवाशांना वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईनवर चढण्याचा आणि उतरण्याचा पर्याय उपलब्ध असेल. दरम्यान, शयनयान डब्यांची व्यवस्था नसल्याने बसून १२ तासांचा प्रवास करणे अव्यवहार्य ठरणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. १२ तासांचा बसून प्रवास  निश्चितच आरामदायी नसेल आणि महागही असेल. त्यापेक्षा प्रवासी इतर नियमित गाड्यांना प्राधान्य देतील, असेही बोलले जात आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या डब्यांच्या रचनेनुसार पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला फक्त आठ डबे जोडले जातील. ज्यामध्ये एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि सात नियमित चेअर कार डब्यांचा समावेश असेल. पैकी एक्झिक्युटिव्ह चेअर कार डब्यात फक्त ५२ प्रवासी बसू शकतील. तर पाच नियिमत चेअर कार डब्यांमध्ये प्रत्येकी ७८ याप्रमाणे ३९० प्रवासी बसू शकतील. याशिवाय, लोको पायलटच्या कोचला जोडलेल्या दोन चेअर कार डब्यांमध्ये प्रत्येकी ४४ या प्रमाणे ८८ प्रवासी बसू शकतील.

एकूण ५३० प्रवासी पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसने एका बाजुने प्रवास करतील. असे असताना, वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण पुणे तसेच नागपुरला फुल्ल झाल्यास वाटेतील जळगाव आणि भुसावळहून बसणाऱ्या प्रवाशांना ऐनवेळी सहजासहजी आरक्षण मिळणारच नाही. त्यासाठी खास जळगाव तसेच भुसावळसाठी काही डबे किंवा सीट राखीव ठेवणे आवश्यक ठरेल. तरच जागेचा प्रश्न सुटू शकेल. अन्यथा, इतर लांबपल्ल्याच्या गाड्यांप्रमाणे नव्याने सुरू झालेल्या वंदे भारतची देखील अवस्था होईल. विशेषतः गर्दीच्या हंगामात प्रवाशांना या गाडीचे आरक्षण मिळू शकणार नाही, असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.