मनमाड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात मनमाडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी यांच्या वेटलिफ्टिंगमधील सलग तीन विक्रमांचा गौरव केला. साईराजने नुकत्याच बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले.

ही अतिशय आनंदाची व गौरवास्पद बाब आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात साईराज याचा गौरव केला. यामुळे मनमाडकरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बिहार येथे झालेल्या सातव्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी याने ऐतिहासिक कामगिरी करीत स्नॅचमध्ये १४० किलो, क्लीन जर्कमध्ये १७२ असे ३१२ किलो वजन उचलत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित केले.

मागील वर्षी त्याचा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम एक किलोने मोडीत काढत घवघवीत यश संपादन केले. आपल्या सलग तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत साईराजने ही पदके प्राप्त केली. २०२३ मध्ये इंदूर येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत कांस्यपदक, २०२४ चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता बिहार येथे झालेल्या स्पर्धेत तीन नवीन राष्ट्रीय विक्रमांसह सुवर्णपदक प्राप्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडेच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या साईराजच्या यशामुळे आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत. साईराजला येथील छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर, डी. डी. शर्मा, अलोकेश बरुवा यांचे मार्गदर्शन लाभले.