जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देऊन आता बराच कालावधी उलटला आहे. विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव दिल्यानंतर परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी पुढे आल्यावर शासनाने सुमारे पावणदोन कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या माध्यमातून उभारण्यात येणारा पुतळा फायबरऐवजी टिकावू ब्राँझ धातुपासून तयार करण्याचा आग्रह आता विद्यापीठाने धरला आहे.
जीवनाचे तत्वज्ञान सहज, सोप्या, सरळ शब्दात आपल्या कवितांमधून सांगणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले असले, तरी तिथे त्यांचा पुतळा नसल्याची खंत जिल्ह्यातून व्यक्त केली जात होती. त्या अनुषंगाने तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात भव्य पुतळा उभारण्याची घोषणा एका कार्यक्रमात केली होती. जिल्हा वार्षिक योजनेतून बहिणाबाईंचा पुतळा उभारण्यासह इतर कामांसाठी सुमारे एक कोटी ९९ लाखाच्या निधीला १३ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर पुतळा उभारणीसाठी एक कोटी ५६ लाख ७४ हजाराची निविदा काढण्यात आली. कार्यादेश निघाल्यानंतर एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून सुरू असलेले पुतळा उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
सद्यःस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे फार पुतळे जळगाव जिल्ह्यात किंवा राज्यात अस्तित्वात नाहीत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात येणारा त्यांचा पुतळा तयार करताना खूपच काळजी घेतली जात आहे. बहिणाबाईं चौधरी यांचा पुतळा या पुढील काळात प्रमाण मानला गेला पाहिजे, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने एक समिती देखील नेमली आहे. ज्यामध्ये बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या आसोदा गावाचे रहिवाशी किशोर चौधरी, व. पू. होले, विद्यापीठातील बांधकाम विभागाचे अभियंता एस. आर. पाटील आदींचा समावेश आहे. ही समिती यापूर्वी एकदा पुणे येथील चित्रकला भवनात तयार होत असलेल्या बहिणाबाईंच्या क्ले आर्टची पाहणी करून आली होती. त्यानंतर आता पुन्हा अंतिम टप्प्यातील क्ले आर्टच्या पाहणीसाठी ही समिती पुण्यात जाऊन आली.
ब्राँझ पुतळ्यासाठी विद्यापीठ आग्रही का ?
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पुतळा फायबरपासून तयार करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र, फायबरऐवजी ब्राँझ धातुचा वापर करून पुतळा उभारल्यास त्यास आयुष्य चांगले राहील. नंतरच्या काळात देखभालीसाठी फार खर्च करावा लागणार नाही, ही बाब निदर्शनास आणून विद्यापीठाने आता सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे.
ब्राँझ धातुच्या पुतळ्यासाठी जास्तीचा खर्च येत असल्यास तो लोकसहभागातून भागविता येईल. गरज पडल्यास त्यात काही प्रमाणात वाटा उचलण्याची तयारी विद्यापीठ प्रशासनाने ठेवली आहे.एस. आर. पाटील (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ)
बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा फायबरऐवजी ब्राँझ धातुपासून तयार करण्यासाठी येणारा खर्च उचलण्यास विद्यापीठाने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आमची सुद्धा त्यास काहीच हरकत नसेल.आर. डी. पाटील (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव)