येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा ८ जून रोजी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शतकभराहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या या संस्थेतून आतापर्यंत भारतीय पोलीस सेवेसह, उपअधीक्षक व उपनिरीक्षक अशा तब्बल २४ हजार ४०८ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. म्हणजे, या सोहळ्याच्या निमित्ताने संस्था २५ हजार पोलीस दलातील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याचा टप्पा ओलांडला जाणार आहे.

या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्यासह पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित उपस्थित राहणार आहेत.

पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर हा सोहळा होईल. सध्याच्या ११३ व्या तुकडीत सरळसेवेद्वारे ५०३ पुरूष व २४६ महिला असे एकूण ७४९ प्रशिक्षणार्थी लोकसेवेत रुजू होत आहे. १९०९ मध्ये पुण्याहून नाशिकच्या त्र्यंबक रस्त्यावर कार्यान्वित झालेल्या पोलीस प्रशिक्षण शाळेची पुढील काळात ‘सेंट्रल पोलीस ट्रेनिंग स्कूल’ अशी ओळख झाली. संस्थेचा नावलौकीक लक्षात घेऊन १९८९ मध्ये शासनाने ‘महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी’ म्हणून महाविद्यालयाचा दर्जा दिला. मध्यंतरी या प्रबोधिनीला स्वायत्त संस्था म्हणून जाहीर करण्यात आले. भारतीय दंड संहिता, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा या प्रमुख कायद्यांसह केंद्र व राज्यातर्फे संमत केलेल्या विविध पूरक कायद्यांचे सखोल ज्ञान प्रबोधिनीतून दिले जाते. आधुनिक काळात गुन्ह्यांचे स्वरुपही बदलत आहे.

हे लक्षात घेऊन नवीन संकल्पनांची ओळख, सायबर गुन्हे अन्वेषण, आर्थिक गुन्हे अन्वेषण, स्फोटक पदार्थ परिचय, कुपी अभ्यासक्रम आदींवर भर देण्यात आला.

प्रबोधिनीत आतापर्यंत भारतीय पोलीस सेवेतील ३८९ अधिकारी, ८२४ उपअधीक्षक तसेच २३ हजार १९५ उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन सेवेत दाखल झाल्याची माहिती प्रबोधिनीने दिली.