मालेगाव : आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पडाव्यात म्हणून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी शोध मोहीम आरंभली आहे. या अनुषंगाने येवला शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या रॅकेटचा छडा लावण्यात यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी अवैध शस्त्रसाठांचा शोध घेण्याच्या दृष्टीने कारवाई करणेबाबत पोलिसांना सुचित केलेले आहे. त्यानुसार येवला पोलिसांचे पथक गस्तीवर असताना न्यायालय परिसरात दोन इसम गावठी पिस्तूल विक्रीसाठी आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला असता एका दुचाकीवरील दोन इसम देवीखुंटाकडून न्यायालयाच्या दिशेने निघाल्याचे दृश्य दिसले. या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती आणि दुचाकीच्या दर्शनी भागावर रायफलचे चित्र होते.
या दुचाकीवरून निघालेल्या इसमांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यांची झडती घेतली असता एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे त्यांच्याकडे आढळून आली. या दोघांना ताब्यात घेऊन हे पिस्तूल, जिवंत काडतुसे व दुचाकी असा एक लाख २२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी इमरान मुन्नवर पठाण (२५,शाह कॉलनी,मदिना मशिदीजवळ, येवला) याच्यासह १६ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोघा संशयितांची कसून चौकशी केली असता येवला शहरातील कामील शकील शेख (२५) याच्याकडे देखील एक पिस्तूल असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी कामील यालाही २० हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार मस्तान उर्फ अरबाज शेख (मोमीनपुरा येवला) याने ही पिस्तुले व काडतुसे विक्रीसाठी पुरविल्याची माहिती दिली. याप्रकरणी भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
हा शस्त्रसाठा विक्रीसाठी ज्याने पुरविल्याचा संशय आहे तो मस्तान फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मस्तान याने हा शस्त्रसाठा कुठून आणला होता आणि त्याचे साथीदार ही शस्त्रे कुणाला विक्री करणार होते, याचाही पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान,येवल्यासारख्या शहरात शस्त्रे विकणाऱ्या टोळीचा छडा लागल्याने तसेच त्यात अल्पवयीन बालकाचा समावेश असल्याचे उघडकीस आल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या अवैध व्यवसायात आणखी काही लोक सहभागी आहेत का, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला होत आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, हवालदार श्रीकृष्ण बोडखे, सोपान शिंदे, सतिष मोरे, जनार्दन दळवी, सतिष मोरे, नवनाथ गायकवाड, दिपक मुंढे, ओमकार तुंगार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.