नाशिकरोड भागात मटक्याच्या अड्डय़ावर छापा टाकून पोलिसांनी १४ संशयितांना अटक करत संबंधितांकडून दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या लेखी शहरात मटका पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले जाते. परंतु, या घटनेने त्याचे अस्तित्व अधोरेखीत झाले आहे. नाशिकरोडच्या राजेंद्रनगर भागात काही जणांकडून मटक्याचा अड्डा चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी मटका चालविणारे आणि पैसे गुंतविणारे असे १४ जण पोलिसांच्या हाती लागले. संशयितांकडून २० हजार ३२५ रुपये रोख, नऊ भ्रमणध्वनी आणि दोन वाहने असा एकूण एक लाख ३० हजार रुपये किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. या प्रकरणी पोपट हिमंतराव काळे, दिनकर किसन लोंढे, अविनाश तुकाराम मोहिते, फारूख शब्बीर शेख, जगदिश मदनलाल कडवे, रवी खंडू साडे, रमेश त्रंबक अहिरे, दीपक केशव भवर, पंढरीनाथ रामचंद्र माळी, किरण फकिरा शेळके, रामभाऊ यशवंत शिंदे, सुनील दिलीप गालफाडे, सुधाकर पांडू कसबे, संतोष राजाराम गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.

सहा पाकिटमारांना अटक

शहर बसमध्ये प्रवास करताना सावज हेरून बॅग व पाकीटे लंपास करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात शहर बसमधून प्रवाशांची पाकिटे वा रोकड गायब होण्याचे प्रकार वाढले होते. या घटनांमागे नियोजनपूर्वक लुटमार केली जात असल्याचे निदर्शनास आले. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी संशयित पाकिटमारांच्या हालचालीकडे लक्ष केंद्रीत केले. मंगळवारी सकाळी टोळी संशयास्पदपणे फिरत असल्याची खबर मिळाल्यावर पंचवटी पोलिसांचे पथक पाठविण्यात आले. निमाणी बसस्थानक परिसरात सहा पाकिटमारांना ताब्यात घेण्यात आले. त्यात या टोळीचा म्होरक्याचाही समावेश आहे. या प्रकरणी समीर बाबू खान, सलीम नसीब खान, विष्णू वाघ, मनोहर नामदेव मोरे, कृष्णा रामराम आनके, जमीन शेख यांचा समावेश असल्याचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.