जळगाव – शहरातील जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार, व्यवस्थापक, जीवरक्षकासह चौघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशीपेठ भागातील बागवान मोहल्ल्यातील सलमान बागवान (२३) हा त्याचे मित्र फैजल बागवान, अझर बागवान, शेख हुजेफा, फरहान बागवान यांच्यासोबत १८ जूनला सायंकाळी जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्याचा बुडून मृत्यू झाला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा >>> कुलूप बंद सार्वजनिक शौचालये खुली करण्यासाठी ठाकरे गटाचा मोर्चा
याप्रकरणी स्थळ पाहणी करीत नायब तहसीलदार राहुल वाघ यांनी अहवाल सादर केला असून, त्यात या अपघाताची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सलमान बागवान याचा ज्यावेळी बुडून मृत्यू झाला, ती वेळ प्रशिक्षणार्थींसाठी राखून ठेवलेली वेळ होती, हे संबंधित ठेकेदाराशी करण्यात आलेल्या करारातून स्पष्ट झाले आहे. गुरुवारी मृत सलमानचा मित्र फैजल बागवान याने दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार राहुल सूर्यवंशी, जीवरक्षक सुनील चौधरी, यादव महाले, पंकज पवार यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.