scorecardresearch

मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई; पोलिसांचा इशारा

गावात मुले चोरणारी टोळी आली आहे, अशा अफवा समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई; पोलिसांचा इशारा
मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई

काही दिवसांपासून मुले पळविणारी टोळी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गावागावांत फिरत असल्याची अफवा पसरली आहे. ग्रामीण भागात अशा अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच समाजमाध्यमांतूनही अफवा पसरवून त्याला खतपाणी घातले जात असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मेहुणबारे येथील पोलिसांनी असा काहीच प्रकार नसून अफवांवर विश्‍वास ठेवू नये. अशा अफवा पसरविल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा- चोपड्यात आजपासून वहनोत्सवासह रथोत्सव; श्री व्यंकटेश बालाजी संस्थानची चारशे वर्षांची परंपरा

संशयी व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

गावात मुले चोरणारी टोळी आली आहे, अशा अफवा समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याने संभ्रम निर्माण होत असून, नागरिकही अशा अफवांवर विश्‍वास ठेवत आहेत. परंतु, पोलिसांचे म्हणणे आहे की, मुले चोरणारी टोळी ही अफवा आहे. या अफवांवर विश्‍वास कुणी ठेवू नये, तसेच कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये. जर गावामध्ये कुणी संशयित व्यक्ती, महिला फिरत असताना मिळून आल्यास, काही अडचणी असल्यास त्याबाबत पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.

हेही वाचा- सप्तश्रृंग गडावरील बोकडबळी प्रथेसंबधी जनहित याचिका; सोमवारी सुनावणी

अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार

गतवर्षी पालघर आणि गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात अविचाराने पसरविलेल्या अफवांमुळे संतापजनक घटना घडून मोठा अनर्थ घडला. त्याची पुनरावृत्ती आपल्या गावांमध्ये होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सजग झाली आहे. या स्थितीत निराधार अफवा, संदेश कोणी प्रसारित करू नये; अन्यथा संबंधितांविरुध्द कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी पोलिसांनी दिली आहे. समाजमाध्यमांतून आलेल्या संदेशांची खात्री न करता तसाच पाठवित प्रसारित केल्याने गावागावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. वास्तव्याचा विपर्यास करणार्‍या अशा संदेशांमुळे समाजात सामूहिक मारहाणीसारखे प्रकार घडू शकतात. अफवा, निराधार संदेश पसरविणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मेहुणबारे येथील सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या