नाशिक – शेतकरी, कामगार, नागरी समस्या, गुन्हेगारी यांसह इतर अनेक प्रश्नांकडे सत्ताधारी महायुतीकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, शिवसेना (उध्दव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे, माकप, भाकप, आम आदमी आदी राजकीय पक्षांसह अंधश्रध्दा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड यांसारख्या संघटनांनी आता मोर्चाचे हत्यार उपसले आहे.  १०, १२ आणि १५ सप्टेंबर असे तीन दिवस नाशिकमध्ये मोर्चे निघणार आहेत. या तीन मोर्चांमुळे नाशिकसह जिल्ह्यातील राजकारणही ढवळून निघण्याची शक्यता आहे.

पहिला मोर्चा १० सप्टेंबर रोजी प्रगतिशील पक्ष आणि जनसंघातर्फे शहरातील नागरी समस्यांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी काढला जाणार आहे. शहरातील खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, काही भागांमध्ये कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा या प्रमुख समस्या मांडल्या जाणार आहेत. या मोर्चात माकप, भाकप, आम आदमी पक्ष, रिपाइं निरपेक्ष या राजकीय पक्षांसह अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि संभाजी ब्रिगेड या संघटनाही सहभागी होणार आहेत. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातून महापालिकेवर हा मोर्चा काढला जाणार आहे.

मुंबईतील मेळाव्यात उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही जण मराठी भाषेच्या मुद्यावर एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात मुंबईनंतर शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांच्यात नाशिकमध्येच सर्वप्रथम दोन्ही पक्षांमध्ये स्नेहमिलन बैठकांना सुरुवात झाली होती. दिवसेंदिवस दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात एकी होताना दिसत आहे. शहरातील वाढलेली गुन्हेगारी, पाणीप्रश्न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष यांसह इतर विषय मांडण्यासाठी ठाकरे गट आणि मनसे यांच्या वतीने संयुक्तपणे १२ सप्टेंबरला अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा भव्य स्वरुपाचा असावा, यासाठी दोन्ही पक्षांकडून काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात तालुका स्तरांवर बैठकांचे सत्र राबविण्यात आले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.

शहरात तिसरा मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर रोजी निघणार आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मोर्चा काढण्याची घोषणा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मागील महिन्यातच केली होती. ज्येष्ठ नेते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेले नेते अशी प्रतिमा असलेले शरद पवार हे स्वत: या मोर्चात उपस्थित राहणार असल्याने पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाचे स्वरुप विशाल असावे, यासाठी शरद पवार गटाकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून शेतकरी अधिक संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.