धुळे : शहरात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरव्यवहारांचा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा पर्दाफाश केला. तब्बल ७ कोटी रुपयांचा खर्च करून ज्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले ते अवघ्या २ ते ४ महिन्यांतच उखडल्याने या रस्त्यावर रांगोळी टाकून भ्रष्ट्राचाराकडे शहरवासीयांचे लक्ष वेधण्यात आले. अशा निकृष्ट विकास कामातून धुळेकरांच्या पैशांची लुट सुरूच असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला.

शहरातील राजवाडे बँक ते श्रीराम पेट्रोल पंप या दरम्यान सुमारे ५०० ते ६०० मीटर अंतराचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी निवडण्यात आला. या रस्त्याची प्रत्यक्षात दुरुस्तीची गरज नसतानाही बेकायदेशीर ठराव आणि मंजुरी करून हे काम रेटण्यात आले. या कामासाठी तयार केलेले अंदाजपत्रक (इस्टीमेट) बोगस व फुगीर असल्याचा आरोप आहे. केवळ एक कोटी रुपयांच्या कामावर तब्बल सात कोटींचा खर्च दाखवण्यात आला. महानगरपालिकेच्या नियमित निधीत तरतूद नसतानाही विकास शुल्काच्या रकमेतून हा खर्च करण्यात आला. लेखापाल आणि नगररचना विभागाच्या नकारात्मक टिपणींकडे दुर्लक्ष करून महानगरपालिका अधिनियमाचे उल्लंघन करत काम सुरू करण्यात आले. इस्टीमेटमध्ये ग्रेड १ व २ असा दाखला देत अत्यंत निकृष्ट दर्जाच्या मिश्रणाचा (एम-१० आणि एम-२०) वापर करण्यात आला. १२ ऐवजी ८ मिमी स्टील वापरले गेले किंवा काही ठिकाणी स्टीलचा वापरच टाळण्यात आला. बिले मात्र पूर्ण अंदाजपत्रकानुसार (इस्टीमेट) काढण्यात आली. शासनाच्या नियमानुसार काँक्रीट रस्त्याचे आयुष्य २५ वर्षे असते, पण हा रस्ता २५ आठवडेही टिकला नाही. रस्त्याच्या बांधकामात वाळूऐवजी डस्ट आणि निकृष्ट खडी वापरल्याने काही महिन्यांतच रस्त्याची खडी बाहेर पडू लागली.

धुळे महानगरपालिकेत आलेले नवीन आयुक्त हे सत्ताधारी भाजपाचे घरगडी म्हणून आणले गेले असल्याने या तक्रारीवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी म्हटले आहे की, धुळेकरांनाच आता जागरूक नागरिकांची भूमिका पार पाडावी लागेल. शहरात जर ३,००० कोटी रुपयांचे रस्ते झाले असतील, तर ते खरोखर अस्तित्वात आहेत का हे जनतेने पाहावे. भ्रष्ट लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदारांना महापालिका सभागृहात नव्हे तर तुरुंगात पाठविणे आवश्यक आहे. अन्यथा धुळ्याचा विनाश अटळ आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी शिवसेनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भामरे, आनंद जावडेकर, पंकज भारस्कर, कपिल लिंगायत, दिनेश पाटील, अनिल चौधरी, सलीम लंबू, अजय चौधरी, सागर निकम, निलेश कांजरेकर, अनिल शिरसाठ, विष्णू जावडेकर, इस्तियाक अंसारी आणि संजय पाटील आदी उपस्थित होते.