नाशिक : मे महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून नाशिकमधील रस्त्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. प्रारंभी लहान असलेले खड्डे दिवसेंदिवस विशाल होत गेले. सध्या तर अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये रस्ताच दिसेनासा झाला असल्याची स्थिती आहे. अनेक दिवसांपासून खड्ड्यांमधून चालण्याचा, पडण्याचा, ठेचकाळण्याचा, हातपाय मोडून घेण्याचा त्रास सहन करणाऱ्या नाशिकच्या नागरिकांची सहनशीलता आता संपली आहे. खड्ड्यांना जबाबदार असलेल्यांना जाब विचारण्यासाठी नाशिककर कोणत्याही राजकीय पक्षाने हाक दिलेली नसतानाही आता रस्त्यावर उतरु लागले आहेत. सत्ताधाऱ्यांसह महानगर पालिकेतील प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करु लागले आहेत.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. प्रत्येक पावसाळ्यात खड्ड्यांमधून वाट काढण्याची नाशिककरांना सवय झाली असल्याने प्रारंभी निर्माण झालेल्या खड्ड्यांकडे कोणी फारसे गांभिर्याने घेतलेच नाही. त्यांचा आकार विशाल झाल्यानंतर आणि शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्यानंतर आणि तरीही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याचे लक्षात आल्यावर हळूहळू नाशिककरांमध्ये नाराजी व्यक्त होण्यास सुरुवात झाली. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने का होईना, विरोधकांनी खड्ड्यांना सत्ताधारी तसेच महापालिका प्रशासनाला जबाबदार धरत टिकास्त्र सुरु केल्याने खड्डे हा विषय गंभीर होऊ लागला.
विशेष म्हणजे, तोपर्यंत खड्ड्यांविषयी महापालिकेत प्रशासकाच्या हातात कारभार जाण्याआधी सत्तेत असलेले भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या विषयावर गप्पच होते. परंतु, नाशिककर आणि विरोधकांचा आवाज वाढू लागल्यानंतर कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी असणारे गिरीश महाजन यांना शेवटी बोलणे भाग पडले. पावसाने उघडीप घेताच खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, आपण त्यासाठी नाशिकमध्ये दोन दिवस मुक्कामही ठोकू, असे आश्वासन त्यांनी अलीकडेच दिले होते.मागील आठवड्यात पावसाने उघडीप घेतली आणि महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. त्यातही काही खड्डे केवळ मातीने बुजविण्यात आले.
पंचवटीतील मखमलाबाद रोड पूर्णपणे खड्डेमय झाल्याने आणि हे खड्डे बुजविण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याने गुरुवारी नागरिकांनी थेट रस्त्यातच बैठक मारली. रास्ता रोको आंदोलन केले. परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे केलेल्या या आंदोलनाने नाशिकचे नागरिक खड्ड्यांनी किती बेजार झाले आहेत, ते दिसून आले. खड्डेमय रस्त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. खड्डे दुरुस्तीवर कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही शहरातील अवस्था सुधारलेली नाही. तात्पुरत्या स्वरुपात बुजविलेले खड्डे पावसात पुन्हा उघडे पडतात. पावसाने शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून प्रमुख रस्त्यांसह कॉलनीतील रस्त्यांची बिकट स्थिती झाली आहे. नागरिकांनी अचानक केलेल्या आंदोलनाची दखल महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंत्यांना घ्यावी लागली. त्यांना थेट आंदोलनास्थळी जावे लागले. पंधरा दिवसात रस्ता खड्डेमुक्त होईल, असे आश्वासन देणे भाग पडले. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक माजी नगरसेवक चांगलेच धास्तावले असल्याची चर्चा आहे.