scorecardresearch

Premium

नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित

रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांना तडाखा दिला. शहर व ग्रामीण भागात झाडांची पडझड झाली.

Pre monsoon rain affect Nashik
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नाशिक – रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांना तडाखा दिला. शहर व ग्रामीण भागात झाडांची पडझड झाली. वादळात कुक्कुटपालन केंद्र, काही घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. मनमाडसह अनेक ठिकाणी कित्येक तास वीजपुरवठा खंडित झाला. झाडांवरील कैऱ्या, चाळीतील कांद्याचे नुकसान झाले. सुरगाण्यातील हतगड येथे रविवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंडपही वादळात कार्यक्रमाआधीच जमीनदोस्त झाला.

आठवडाभरापासून जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वातावरणात रविवारी बदल झाले. सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अकस्मात आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. द्वारका, वडाळा भागात झाड कोसळले. यात जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. गोदाकाठी उभारलेला मंडपही कोसळला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा अधिक जोर होता. हरसूलच्या दाणवेश्वर परिसरात दोन तास पाऊस झाला. शेतांमध्ये पाणी साचले. जनावरांची ऐरण पाण्यात गेली. वादळी वारा व पावसाने ग्रामीण भागात छप्पर दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत. पावसाने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तारांबळ उडवली. त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी रविवारी तुलनेत अधिक गर्दी असते. दर्शन रांगेत तीन, चार तास प्रतीक्षा करावी लागते. या भागात अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

हेही वाचा – नाशिकसह खानदेशात वादळी वाऱ्याचा कहर; अनेक वृक्ष कोसळले, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट

दिंडोरी तालुक्यात वादळी वाऱ्याने कांद्याचे नुकसान झाले. बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठविलेला आहे. वादळात काही ठिकाणी पत्रे उडून गेल्याने पावसाने कांदे भिजले. मनमाड, येवला व नांदगाव भागात वेगळी स्थिती नव्हती. मालेगाव आणि बागलाण तालुक्यात पावसापेक्षा वादळी वाऱ्यामुळे अधिक नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव या भागात वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. धुळीमुळे वाहने चालविणे अवघड झाल्याने चालकांनी वाहने सुरक्षितस्थळी उभी केली. रामपुरा भागात कुक्कुटपालन केंद्राचे पत्रे उडून नुकसान झाले. भटू खैरनार यांचे कुक्कुटपालन केंद्र व घर वादळी पावसात जमीनदोस्त झाले. बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे, द्याने, नामपूर या भागातही वादळी वाऱ्याने थैमान घातले. मनमाड शहरात चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होता. इतर भागात कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती होती.

हेही वाचा – नाशिक : संत निवृत्तीनाथ पालखीचे नाशिककरांकडून उत्स्फुर्त स्वागत; मनपाकडून स्वागतासाठी तीन लाखांचा निधी

अजित पवार यांचा कार्यक्रम होण्याआधीच मंडप जमीनदोस्त

सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उभारलेला मंडप सकाळी वादळी पावसात जमीनदोस्त झाला. दुर्गम आदिवासी भागात तातडीने नव्याने मंडप उभारणे अशक्य होते. त्यामुळे जमीनदोस्त झालेला मंडप काढून घेतला गेला. कार्यक्रमस्थळी केवळ व्यासपीठाची रचना ठेवली गेल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pre monsoon rain affect nashik district fall of trees ssb

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×