नाशिक : जुन्या नाशिकमधील वाकडी बारव ते पंचवटीतील रामकुंड या मिरवणूक मार्गावर सुमारे २०० सीसी टीव्ही कॅमेरे आणि सहा ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि ढोल पथकांच्या बैठका घेत समन्वय साधला. मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून आवाजाच्या भिंती (डीजे) उभारण्यास मुभा मिळाल्याने ढोल पथकांबरोबर मिरवणुकीत आवाजाच्या भिंतींचा दणदणाट होणार आहे. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. शहर पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी, दंगा नियंत्रक पथक, राज्य. राखीव आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक असे तब्बल तीन हजार अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार आहेत.

हे ही वाचा…नाशिक : संशयिताकडून चोरीच्या २७ दुचाकी जप्त

संपूर्ण मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जाईल. या व्यतिरिक्त सहा ड्रोन कॅमेरे तैैनात असतील. त्यांच्यामार्फत मिरवणूक मार्गालगतच्या लहान-मोठ्या गल्लीतील हालचालींचे अवलोकन केले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी १० जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. गणेश मंडळ आणि ढोल पथकांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन यंत्रणेने केले आहे. कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईस नाशिक पोलीस सक्षम असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

मिरवणूक रेंगाळू न देण्याचे आव्हान

वाकडी बारव येथून सुरू होणारी मिरवणूक दामोदर चित्रपटगृहापासून पुढे जाण्यास विलंब होतो. ही बाब बैठकीत काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली होती. स्थानिक राजकीय नेत्यांची मंडळे आपल्या भागात अधिकाधिक वेळ थांबतात. परिणामी, मागील मंडळे अडकून पडतात. विसर्जन मिरवणूक रेंगाळू न देण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

हे ही वाचा…अनुदानावर ट्रॅक्टरचे आमिष दाखवून शेतकऱ्याची फसवणूक, संशयिताविरुध्द दोन पोलीस ठाण्यात गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेझर दिव्यांवर बंदी

मागील वर्षी प्रखर दिव्यांच्या लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांवर पूर्णत: बंदी घालण्याचे आधीच निश्चित झाले आहे. गत वर्षी अनेक मंडळांकडून लेझर किरणांचा वापर केला गेला. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या आणि सहभागी झालेल्या भक्तांच्या डोळ्यांना इजा झाली होती. काहींच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने या दिव्यांच्या वापरास पूर्णत: बंदी आणण्याचे आधीच मान्य केलेले आहे.