नाशिक : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आजही जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाणी समस्या जैसे थे आहे. पाण्यासाठी रानोमाळ भटकणाऱ्या बायाबापडय़ांचा संघर्ष आजही थांबलेला नाही. त्यांचा हा संघर्ष ‘घोट’ या लघुपटाव्दारे नाशिक जिल्ह्यातील पाण्यासाठी काम करणाऱ्या जल परिषद मित्रपरिवाराने मांडला आहे.

आतापर्यंत पाणी या विषयावर अनेकांनी लघुपट तयार केले आहेत. परंतु, जल परिषद मित्र परिवार स्वत: या अनुभवातून जात असल्याने दिसणारे वास्तव त्यांनी  मांडले आहे. जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आजही पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागते. कधी उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना तर, कधी अंधारात जीव मुठीत घेऊन पाणी शोधतांना अनेकांच्या जीवावर बेतते. एकीकडे शहरी भागात पाण्याचा अपव्यय होत असताना दुर्गम भागातील आया बहिणींना आजही पाण्यासाठी मरावे लागत आहे, असे हे अंगावर शहारा आणणारे वास्तव या लघुपटातुन मांडण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका दुष्काळी गावाची परिस्थिती या लघुपटात दाखविण्यात आली आहे.

एक आई दिवसभर राबून आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करते. मात्र तिचा दिवसातील अर्धाअधिक वेळ पाणी आणण्यातच निघून जातो. घरातील दारिद्रय़ आणि गावात पाण्याचा तुटवडा याच्या कात्रीत ती सापडलेली असते. घरात पाण्याचा थेंब नसल्याने ती मूकबधिर असणाऱ्या आपल्या मुलीला घेऊन अंधारात पाणी शोधण्यासाठी जाते. अंधारात दोन किलोमीटर रस्ता तुडवल्यानंतर विहीरीजवळ जाऊन पोहचते. अंधारात अंदाज चुकल्याने गर्भवती असलेली ती महिला विहिरीत पडते. आई विहीरीत पडल्याचे दिसत असूनही मुकेपणाने मुलीला काहीच करता येत नाही. ती धावतच गावात जाते. मात्र तिचा एक भाऊ लग्नाच्या वरातीत तर दुसरा भाऊ खेळण्यात गुंतलेला असतो. अशावेळी ती आजोबा आणि मामाला हातवारे करुन झालेला प्रकार सांगते. मामा आणि इतर गावकरी धावत पळत विहिरीजवळ जातात. एकीकडे देश आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळय़ा क्षेत्रात झेप घेत असताना दुसरीकडे गावागावातील पाण्याचा प्रश्न मात्र कोणालाच सोडविता आलेला नाही हे वास्तव आहे. या माय माऊलीचं पाण्याशिवाय पुढे काय होतं. हेही लघुपटात मांडण्यात आले आहे. या लघुपटाची संकल्पना राकेश दळवी, दिग्दर्शन- योगेश रिझंड, भुषण पागी, पटकथा आणि संवाद लेखन तुकाराम चौधरी यांचेआहे. अश्विनी भिवसन, अंजना चौधरी, मनोहर खुताडे, देवचंद महाले, गीतेश्वर खोटरे यांच्या लघुपटात भूमिका आहेत. सहकलाकार म्हणून ज्ञानेश्वर गावित, प्रल्हाद पवार, मनोज चौधरी, दुर्वादास गायकवाड, अशोक बोरसे, नामदेव घुलूम यांनी काम केले आहे.  जल परिषद परिवाराचे यासाठी सहकार्य लाभले आहे.