जळगाव – जिल्ह्यातील केळी उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी कमी किमतीत रोगमुक्त व दर्जेदार टिश्यूकल्चर (उतिसंवर्धित) रोपे पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून विशेष प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित प्रकल्पाकरीता आवश्यक जागांचा व्यावहारिकदृष्ट्या अभ्यासही केंद्राच्या पथकाने मुक्ताईनगर व यावल तालुक्यांना भेटी देऊन केला आहे.

जळगाव जिल्हा सुमारे ६० हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी लागवड करून राज्यातील एकूण केळी उत्पादनात ६० टक्के आणि देशातील एकूण केळी उत्पादनात १५ टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलतो. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जिल्ह्यात केळीसाठी समूह विकास केंद्राला (क्लस्टर) मंजुरी दिली असून, त्या माध्यमातून आगामी काळात केळी निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. भुसावळहून रेल्वेद्वारा थेट मुंबईच्या जेएनपीटी बंदरापर्यंत केळीची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणाऱ्या या सुमारे २०० ते २५० कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार देखील झाला आहे.

सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सुद्धा दिली. अशा स्थितीत केळी उत्पादन वाढीसाठी पूरक ठरू शकणाऱ्या टिश्यूकल्चर रोपांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या मदतीने सुरू झाल्या आहेत. त्याकरीता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला आहे. टिश्यूकल्चर केळी रोपांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक त्या जागेचा व्यावहारिक अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाकडून आलेल्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी तसेच यावल तालुक्यातील हिंगोणा येथे नुकतीच भेट दिली.

यावेळी जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के आदी उपस्थित होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या पथकाने सालबर्डी येथील २६ हेक्टर आणि हिंगोणा येथील २० हेक्टर जागेची पाहणी केली. पैकी हिंगोणा येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ताब्यातील समतल व पाण्याची मुबलक उपलब्धता असलेल्या जागेला केंद्राच्या पथकाने पसंती दर्शवली. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी केंद्राच्या पथकाने चर्चा सुद्धा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित प्रकल्प जळगाव जिल्ह्यातच राबविण्यात यावा म्हणून सादरीकरण करताना जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात असलेल्या संधी, उपलब्ध संसाधने आणि केळी शेतकऱ्यांचा लाभ, या बाबींवर भर दिला.

शेतकऱ्यांना माफक दरात टिश्यूकल्चर केळी रोपे पुरविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात लवकरच एक प्रकल्प सुरू होणार आहे. त्यासाठी मुक्ताईनगर किंवा यावल तालुक्यातील कोणतीही एक जागा निश्चित होईल.- रक्षा खडसे (केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री)