नाशिक – प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नियमित २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख अशा निवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना निवडश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. शिक्षकांना २० वर्षात हा लाभ मिळालेला नाही. निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी ऑगस्ट महिन्यात प्रसिध्द करण्यात आली होती. संबंधित काम करणाऱ्या लिपिकांस सहायक मदतनीस नेमणे, निवड श्रेणी कामासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, अशी कार्यवाही करण्यात आली आहे. परंतु, पुढील कामकाजास सुरूवात झालेली नाही. याबाबत संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप कुठलीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात बेमुदत साखळी उपोषण, त्यानंतर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
हेही वाचा >>>जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा महायुतीचा दावा
संघटनेचे पदाधिकारी संजय पगार यांनी यासंदर्भात माहिती दिली. जिल्ह्यात निवड श्रेणीसाठी साडेतीन हजार शिक्षकांचे भविष्य टांगणीला आहे. यातील काही मयत झाले. काही सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. पहिल्या टप्प्यातील काम झाले असले तरी पुढील कार्यवाही अद्याप बाकी असल्याचे पगार यांनी सांगितले.आंदोलनाच्या ठिकाणी १५ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी यावे आणि पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी पगार यांनी केली.