शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अमृतधाम परिसर अपघात प्रवण क्षेत्र ठरल्याचे वारंवार अधोरेखीत होत असूनही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी जननायक वैचारिक मंच व संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. अलीकडेच झालेल्या अपघातात रस्त्यालगत उभी असणारी नऊ वर्षीय मुलगी व तिची आई गंभीर जखमी झाली. जखमी बालिका मृत्यूशी झुंज देत आहे. अपघातानंतर संतप्त भावना व्यक्त करणाऱ्या स्थानिकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडींकडे लक्ष वेधले जाणार असल्याचे संघर्ष समितीने म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील के. के. वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल या दरम्यानच्या चौफुली राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या सदोष नियोजनामुळे अपघात क्षेत्र बनले आहे. रासबिहारी चौकात तर सातत्याने अपघात घडत आहेत. अपघातांच्या मालिकेने अनेकांना जायबंदी केले तर काहींना कायमचे अपंगत्व आले. कित्येकांना जीव गमवावा लागला असतांना प्राधिकरण नागरिकांना रस्ता काळजीपूर्वक ओलांडा, अशी सूचना करत आहे. या महामार्गावर के. के. वाघ महाविद्यालय, इंदिरानगर आणि ज्या ठिकाणी उड्डाणपूल नाही, त्या ठिकाणी अपघात घडत आहेत. दुसरीकडे अपघातात जायबंदी होणाऱ्या व मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियास नुकसान भरपाई मिळण्याची कुठलीही तरतूद नसल्याने अपघातातून सावरण्यासाठी त्यांना वैद्यकीय खर्चही करावा लागतो. या बाबतच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी संघर्ष समिती करणार आहे.
काही दिवसांपूर्वी अमृतधाम चौफुलीवर मोटारसायकल, कार आणि बस यांच्यात तिहेरी अपघात झाला. त्यात पाच ते सहा जण जखमी झाले. निकीता खंदारे (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे पाय निकामी होण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. निकीताच्या आईला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. अपघाताची भीषणता लक्षात घेऊन स्थानिकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांवर अमानुष लाठीमार केला. यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. वारंवार अपघात घडूनही राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाने या परिसरात उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. एखादा अपघात झाला तर कोणाच्या लक्षातही येणार नाही असे अतिशय कमी उंचीचे गतिरोधक टाकून वेळ मारून नेली जाते. अवघड वाहने त्यावरून जात असल्याने पुढील काही दिवसात हे गतिरोधक रस्त्यात लुप्त होऊन जातात. प्राधिकरणाच्या कार्यशैलीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे संघर्ष समितीने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2015 रोजी प्रकाशित
‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’विरोधात आज आंदोलन
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अमृतधाम परिसर अपघात प्रवण क्षेत्र ठरल्याचे वारंवार अधोरेखीत होत असूनही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी जननायक वैचारिक मंच व संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. अलीकडेच झालेल्या अपघातात रस्त्यालगत उभी असणारी नऊ वर्षीय मुलगी व तिची आई गंभीर जखमी झाली. जखमी बालिका मृत्यूशी […]
Written by रोहित धामणस्कर
First published on: 23-09-2015 at 07:44 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest in nashik